मुंबई : राज्यातली सत्तास्थापनेची प्रक्रिया आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. महाविकासआघाडीचं सरकार येण्याआधी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या नेहरु सेंटरमध्ये ही बैठक होत आहे. शिवसेनेकडून या बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई उपस्थित आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आले आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाल, अहमद पटेल आणि बाबा सिद्दीकी यांनी या बैठकीला हजेरी लावली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर सगळ्या गोष्टी जनतेपुढे मांडू, असं वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी परवा दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर केलं होतं. त्यामुळे या बैठकीनंतर मंत्रिपदाचा फॉर्म्युला आणि किमान समान कार्यक्रम याबाबतच्या सगळ्या गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडीचा मुख्यमंत्री कोण होईल? हेदेखील या बैठकीनंतर समोर येऊ शकतं.


उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे. आज सकाळी झालेल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीतही सगळ्या आमदारांनी उद्धव ठाकरेनी मुख्यमंत्री व्हावं, अशी मागणी केली. तर शरद पवारही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी आग्रही आहेत. तसंच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं नसेल तर शरद पवार यांनी संजय राऊत यांचं नाव सुचवलं आहे.