Raj Thackeray On Marathi : महाराष्ट्रात मराठी सोडून हिंदी का बोलत आहात? माझा हिंदीला विरोध नाही. परंतु महाराष्ट्रात मराठी सोडून हिंदी कानावर आल्यावर त्रास होतो. हिंदी ही उत्तम भाषा आहे. परंतु हिंदी ही राष्ट्रीय भाषा नाही, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच राज्यातील सर्वच शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्रात सुरु असलेल्या विश्व मराठी संमेलनात राज ठाकरे बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मी अत्यंत कडवट मराठी आहे आणि माझ्यावर संस्कारच त्या प्रकारचे झाले. महाराष्ट्रात मराठी शाळा बंद होत असताना अमेरिकेत सुरु होत आहे हे काही कमी आहे का. आपण आधी महाराष्ट्रामध्ये लक्ष देणे गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या शहरांमध्ये मराठी सोडून हिंदी कानावर यायला लागते त्यावेळी त्रास व्हायला लागतो. हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नव्हे. जशा इतर भाषा आहेत तशा इतर भाषा आहेत. राष्ट्रभाषा म्हणून कुठलीही भाषा नेमली नाही. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संवाद साधण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी भाषा ठेवली. हे जेव्हा पहिल्यांदा बोललो तेव्हा अनेक लोक माझ्या अंगावर आले. तेव्हा मी गुजरात हायकोर्टाचा कागद समोर ठेवला. भाषा उत्तम असली तरी हिंदी राष्ट्रभाषा नाही," असे राज ठाकरे यांनी म्हटलं.


मराठी लोक बोलण्यात हिंदी का वापरतात? मराठी भाषा उत्तम आहे. पण आज ही भाषा घालवण्याचा, बाजूला सारण्याचा राजकीय प्रयत्न होतोय ते बघून माझ्या तळपायाची आग मस्तकात जात आहे. त्यामुळे पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी सक्तीची करा. ज्या ठिकाणी जन्म झाला तिथे मुलांना जर्मन आणि फ्रेंन्च शिकवलं जातं. खूप भाषा शिका. पण जिथे राहतायत तिथली भाषा तरी शिका. यामध्ये कमीपणा कसला आला. देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या भाषेबद्दल वाटतं. पंतप्रधानांना स्वतःच्या भाषेबद्दल प्रेम लपवता येत नसेल तर तुम्ही आम्ही का लपवत आहोत? ही टीका नाही. प्रत्येक माणसाला आपल्या भाषेबद्दल प्रेम आहे. ज्या राज्यामध्ये मी राहतो तिथला एक मराठी माणूस घर घ्यायला जातो तिकडच्या जैन सोसायटीमधला माणूस सांगतो की मराठी माणसाला घर देणार नाही. आम्ही काय करायचं मग? असा सवाल राज ठाकरेंनी केला.


आमचं बोटचेपी धोरण असल्यामुळे हे सगळं महाराष्ट्रात होतं. आम्हीच पहिले मागे हटतो. कोण म्हणतं मराठी माणसाकडे पैसे नाहीत. एकदा महाराष्ट्र फिरा मग तुम्हाला कळेल मराठी माणूस कुठेय. आधी आपण महाराष्ट्राकडे लक्ष देऊ. महाराष्ट्रामध्ये लक्ष देणे खूप गरजेचं आहे. मराठी भाषा, महाराष्ट्र ही तुमची ओळख आहे. ती ओळख आपण पुसून टाकतोय. प्रत्येक राज्य आपलं भाषा जपत असतं. आम्ही काय गोटे आहोत का घरंगळत जायला. माझी विनंती आहे की कोणीही समोर येऊ देत आपण मराठीत बोला फक्त. आपण समोरच्याला सवय लावा तेव्हा तो स्वतःहून मराठीत बोलेल. मी आंदोलन सुरु केलं तेव्हा हिंदीतील कलाकार मराठी बोलायला लागले. म्हणजे मराठी येत होतं. समोरचा मराठी बोलताना चुकला तर हसू नका त्यांना सुधरवा, असेही राज ठाकरे म्हणाले.


महाराष्ट्रामधल्या जेवढ्या शाळा आहेत त्यामध्ये पहिली ते दहावी मराठी सक्तीची करा. हे फक्त शासनाने उपकार करावेत बाकी आम्ही सगळं बघून घ्यायला तयार आहोत, अशी मागणी राज ठाकरेंनी केली.


दरम्यान, राज ठाकरेंच्या मागणीवर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली.  सर्व शाळांमध्ये या वर्षीपासून पहिली ते दहावी मराठी सक्तीची करण्यात आली आहे. आम्ही पुढच्या काळात मराठीमध्ये उच्च शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे, असे मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं.