कळंबोलीत बिल्डरकडून पैसे उकळण्यासाठी बनवला होता बॉम्ब
१७ जूनला सुधागड हायस्कूलजवळ हातगाडीवर बॉम्ब ठेवण्यात आला होता.
नवी मुंबई : नवी मुंबईतल्या कळंबोली इथं सापडलेल्या बॉम्ब प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. बिल्डरला धमकावण्यासाठी आणि त्याच्याकडून दोन कोटी रुपये उकळण्यासाठी हा बॉम्ब तयार करण्यात आला होता. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात सुशील प्रभाकर साठे, मनीष भगत आणि दीपक दांडेकर या तिघांना अटक करण्यात आलीय. यानंतर ही धक्कादायक बाब समोर आलीय. १७ जूनला सुधागड हायस्कूलजवळ हातगाडीवर बॉम्ब ठेवण्यात आला होता.
पोलिसांनी हा बॉम्ब निकामी केला. या बॉम्बमध्ये अमोनिया नायट्रेड आणि जिलेटिनचा वापर करण्यात आला होता. तिन्ही आरोपींवर कर्ज झाले होते. यासाठी एका बिल्डरच्या घराच्या परिसरात बॉम्ब स्फोट घडवून उर्वरित बॉम्बची धमकी देऊन बिल्डरकडून दोन कोटी रुपये वसूल करण्याचा या आरोपींचा प्रयत्न होता.
दीपक दांडेकरची दगडखाण असल्याने या आरोपीला बॉम्ब कसा बनवायचे हे माहित होतं. मात्र बॉम्ब स्फोटाची वेळ जुळवता आली नसल्याने स्फोट होऊ शकला नाही. हे तिघे कुठल्या दहशतवादी संघटनेशी संबधित नसल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.