मुंबईत ६०६ ठिकाणी मलेरिया तर ३१०२ ठिकाणी डेंग्यूचे डास
मुंबईकर मात्र स्वत:च्या घरातच डेंग्यू, मलेरिया पोसत असल्याचे समोर आले आहे.
मुंबई : पालिकेकडून साथींचे आजार रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात असताना मुंबईकर मात्र स्वत:च्या घरातच डेंग्यू, मलेरिया पोसत असल्याचे समोर आले आहे. गेल्या तीन महिन्यांत पालिकेच्या कीटकनाशक विभागाने इमारती, घरे आणि डास उत्पत्तींच्या चार लाखांवर ठिकाणी तपासणी केली असून यात ६०६ ठिकाणी मलेरिया, ३१०२ ठिकाणी डेंग्यू तर २७२४ ठिकाणी दोन्ही प्रकारचे डास आढळले आहेत. या सर्वांना पालिकेने नोटीस बजावली असून प्रत्येक दिवशी ३० जणांना नोटीस दिली जात आहे.
साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत पालिकेकडून वर्षभर जनजागृती केली जाते. शिवाय धुम्र फवारणी, डास-उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याचे काम सुरू असते. अस्वच्छता आणि पाणी साठून राहणार्या ठिकाणी डेंग्यू, मलेरियाचा प्रसार करणार्या डासांची उत्पत्ती होत असल्यामुळे ही ठिकाणे नष्ट केली जात आहेत. पावसाळा काही दिवसांवर आल्यामुळे या कामाचा वेग आणखी वाढला आहे. मात्र जानेवारीपासून केलेल्या या तपासणी आणि कारवाई मोहिमेत मुंबईकरांचा बेजबाबदारपणा समोर येत आहे.
या तपासणीत ६०६ ठिकाणी मलेरिया पसरवणारे एनॉफिलीज स्टिफेन्सी डासांच्या अळ्या, ३१०२ ठिकाणी डेंग्यू पसरवणारा एडिस इजिप्तीच्या तर २७२४ ठिकाणी दोन्ही आजार पसरवणारे डास आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी डास उत्पन्न होणार नाहीत, अस्वच्छता पसरणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
कुठे होते उत्पत्ती ?
- मलेरियाचे डास पसरवणारा एनाफिलीस स्टिफेन्सी डासांची उत्पत्ती विहिरी, पाण्याच्या टाक्या, कारंजे, कुलिंग टॉवर, पाण्याचे हौद, इमारत बांधकामाच्या ठिकाणी होते.
- डेंग्यूचा प्रसार करणारा एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती फेंगशुई झाड, बांबू प्लँटस, मनीप्लँटससारखी शोभिवंत झाडे, घराजवळ ठेवलेल्या कुंड्या, एसी, फ्रीज अशा ठिकाणी होत असल्याचे समोर आले आहे.