सलमानची Y+ सिक्योरिटी भेदत `तो` सेटवर आला अन्...; दादरमधील घटना! म्हणाला, `बिश्नोईला...`
Salman Khan Shooting In Mumbai: अभिनेता सलमान खानच्या जीवाला धोका असल्याने त्याला व्हाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. असं असतानाही हा प्रकार घडला.
Salman Khan Shooting In Mumbai: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलमान खान ज्या सेटवर शुटींग करत होता तिथे एका व्यक्तीने बेकायदेशीररित्या प्रवेश केला. संशय आल्याने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चक्क लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकावलं. 'बिश्नोईला सांगू का?' असा प्रश्न या व्यक्तीने विचारल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. या व्यक्तीला शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये तपासासाठी नेण्यात आलं आहे.
सलमान सेटवर असतानाच...
समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना मुंबईमधील झोन-5 मध्ये घडली. संशयित आरोपीने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर केला. पोलीस आता या व्यक्तीची चौकशी करत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, हा सारा प्रकार घडला तेव्हा सलमान खान सेटवरच होता. सलमान सेटवर असताना ही अज्ञात व्यक्ती आतमध्ये आली. त्यावेळी सेटवरील सुरक्षारक्षकांनी या व्यक्तीला पाहून हटकलं असता त्याने लॉरेन्स बिश्नोईचं नाव घेतलं. त्यानंतर या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.
पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादर पश्चिममध्ये शुटींग सुरु होतं. सलमानच्या एका चाहत्याला शुटींग पाहायचं होतं. मात्र सुरक्षारक्षक त्याला धक्काबुक्की करत होते. या व्यक्तीला आतमध्ये जायचं होतं त्यावरुन वादावादी झाली. त्यावेळी संतापलेल्या या तरुणाने लॉरेन्स बिश्नोईचं नाव घेतलं. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी या व्यक्तीला पकडून ठेवत पोलिसांना बोलावलं. हा तरुण मुंबईचा रहिवासी आहे. पोलीस आता या तरुणीची पार्श्वभूमी तपासत आहेत. प्राथमिक तपासामध्ये या व्यक्तीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आलेली नाही.
बाबा सिद्दींकींची हत्या
सलमान खानला अनेकदा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने अनेकदा धमकी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानकडे 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी वांद्रे येथील सलमानच्या घराच्या दिशेने गोळीबारही करण्यात आला होता. या हल्ल्यामागेही लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग होता. सलमान खानचे निकटवर्तीय माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचीही हत्या लॉरेन्स बिश्नोई टोळीनेच केली.
पाच कोटींच्या धमकी प्रकरणात काय घडलं?
मागील काही काळापासून सलमानला वारंवार धमकावण्याचे प्रकार समोर आले आङेत. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने अनेकदा धमकावण्यात आलं आहे. धमकी देणाऱ्याने स्वत:ची ओळख लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अशी सांगत त्याच्याकडे पाच कोटींची मागणी केली होती. 'सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर त्याला आमच्या मंदिरामध्ये येऊन माफी मागावी लागेल किंवा पाच कोटी रुपये द्यावे लागतील. असं नाही केलं तर आम्ही त्याला जिवे मारुन टाकू. आमची टोळी अजूनही सक्रीय आहे,' असं या धमकीत म्हटलं होतं. पोलिसांनी या प्रकरणामध्ये धमकावणाऱ्या व्यक्तीला कर्नाटकमधून अठक केली. धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचं नाव भीकाराम जलाराम बिश्नोई असं असून तो 35 वर्षांचा आहे. तो मूळचा राजस्थानमधील जालौर येथील रहिवासी आहे.