दिग्दर्शक रवी जाधव यांनी दिला मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा
रितेश देशमुखसोबतच आता मराठीतील लोकप्रिय दिग्दर्शक आणि आता नव्याने होऊ घातलेला अभिनेता रवी जाधव याने देखील या मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिला आहे.
मुंबई : रितेश देशमुखसोबतच आता मराठीतील लोकप्रिय दिग्दर्शक आणि आता नव्याने होऊ घातलेला अभिनेता रवी जाधव याने देखील या मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिला आहे.
रितेश देशमुखने रात्री याबाबत ट्विट केलं असताना आता रवी जाधव यांनी नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आणि या पोस्टमध्ये त्यांनी #एकमराठालाखमराठा #मराठाक्रांतीमोर्चा #मुंबई अशा हॅशटॅगचा वापर केला आहे. रवी जाधवने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये एक भलामोठा हत्ती आहे. आणि त्याच्याशी दोन हात करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा एकटा लढताना दिसत आहे. यावरून कितीही संकट आली तरीही मराठा बांधव कोणत्याही परिस्थिती दोन हात करण्याच्या तयारीत असल्याचं यावरून सुचित केलेलं आहे.
आपल्या साऱ्यांना माहितच आहे, रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित एक सिनेमा तयार करत आहे. ज्याचं नाव 'शिवाजी' असं आहे. तर या सिनेमाची संपूर्ण धुरा ही दिग्दर्शक रवी जाधव यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे ही जोडगोळी एकत्र येऊन नक्कीच आपल्याला उत्तम सिनेमा दाखवतील यात शंकाच नाही. तसेच आता आपल्याला रवी जाधवच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वातील आणखी एक गोष्ट समजली आहे. आणि ती म्हणजे रवी जाधव यांचा अभिनय. 'कच्चा लिंबू' या सिनेमात रवी जाधव मोहन काटदरे यांची भूमिका साकारत आहेत. त्यामुळे अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाने मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिल्याने मराठा बांधवांच्या उत्साहात आणखी वाढ झालेली आहे.
मराठा क्रांती मोर्चाने एक वेगळंच रूप धारण केलं आहे. मुंबईत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झालेले दिसत आहे. मराठा आरक्षण आणि कोपर्डी प्रकरणाला न्याय या मराठा बांधवांच्या मुख्य दोन मागण्या आहेत. आता या मागण्या पूर्ण होणार का? सरकार या प्रश्नांवर तोडगा काढणार का? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे.