मुंबई : मराठा क्रांती मोर्चानं आज मंत्रालयात धडक दिली. खासदार छत्रपती संभाजीराजे यांना दिलेली आश्वासनं पूर्ण कधी करणार, असा सवाल आंदोलकांनी विचारला. मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांबद्दल संभाजीराजे यांनी फेब्रुवारी महिन्यात आझाद मैदानात उपोषण केलं होतं. त्यावेळी सरकारनं संभाजीराजेंच्या मागण्या पूर्ण करु असं आश्वासन काही तारखा जाहीर करत दिलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तारखा उलटून गेल्या तरी आश्वासनं पूर्ण झाली नाहीत, त्यामुळे मराठा क्रांती मोर्चामधले आंदोलक संतप्त झाले आहेत. त्यांनी थेट मंत्रालयात धडक दिली.  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सचिवांच्या दालनात गेल्या दीड तासापासून ठिय्या आंदोलन सुरु होतं. दरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी या आंदोलकांना उद्या चर्चेसाठी बोलावलं आहे.


मंत्रालयात आंदोलन करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मराठा क्रांती मोर्चा आता या नंतर काय भूमिका घेते याकडे मराठा समाजाचं लक्ष लागलं आहे.