Marathara Reservation Morcha Latest Update : सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा 26 जानेवारीला मुंबईत धडकणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मराठा आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात आंदोलन करण्यापासून आणि मुंबईत येण्यापासून मनोज जरांगे पाटील यांना रोखले नाही, तर मुंबई ठप्प होईल अशी भीती वकील गुणरत्न सदावर्ते यांनी बुधवारी उच्च न्यायालयात व्यक्त केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील  यांना मुंबई हायकोर्टाने नोटीस बजावली होती. त्यानंतर मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोज जरांगे पाटील 26 जानेवारीला मुंबईत दाखल होऊन ते आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोवर मागे हटणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र हा मोर्चा बेकायदेशीर असल्याचं सांगत गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. या सुनावणीदरम्यान कोर्टाने मनोज जरांगे पाटील, आझाद मैदान पोलीस आणि राज्य सरकारला नोटीस बजावली होती. सुनावणीदरम्यान, राज्य सरकारच्यावतीने महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनीही मनोज जरांगे यांचे हे आंदोलन रोखण्याचा न्यायालयाला अधिकार असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना रोखण्यास नकार दिला आहे.


न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. रस्ते अडवले जाऊ नयेत यासाठी राज्य सरकार योग्य त्या उपाययोजना करू शकते. जरंगे पाटील हे न्यायालयासमोर नाहीत. त्यामुळे, त्यांच्याविरोधात कोणतेही आदेश दिले जाऊ शकत नाहीत. असे असले तरी मुंबईकरांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याची मुभा राज्य सरकारला असेल, असे कोर्टानं म्हटलं आहे. या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षण समर्थक आझाद मैदान येथे येणार आहेत. मात्र, आझाज मैदानाची क्षमता पाच हजारांची आहे. त्यामुळे, आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने पार पडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आंदोलनाकरिता नव्या जागेचा विचार करा, असेही कोर्टानं म्हटलं आहे.


दरम्यान,आरक्षण दिलं तर पुण्यातून माघारी निघू असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. "आम्ही सर्व व्यवस्था करून आलेलो आहोत. फक्त सरकारने पोरांची व्यवस्था करावी अन्यथा मुंबईची काय अवस्था होईल. असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच मुंबईला जायला निघालेलो आहे, जर आरक्षण देणार असेल तर पुण्यातूनही माघारी जाईन. सरकारने अंत पाहू नये असेही जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला 26 जानेवारीला मुंबईत येण्याचं आवाहन केलं आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी जागेवरती बसून आंदोलन करावं असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.