मराठा समाज आंदोलन : एसटीला फटका, २१८ आगारातील गाड्या बंद
महाराष्ट्र बंदचा मोठा फटका एसटी वाहतुकीला बसला आहे. आत्तापर्यंत केवळ ११ टक्के बसच्या फेऱ्या झाल्या आहेत.
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज राज्यात समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. राज्यात अनेक ठिकाणी या आंदोलनाला गालबोट लागले. जाळपोळ, तोडफोड करण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्र बंदचा मोठा फटका एसटी वाहतुकीला बसला आहे. आत्तापर्यंत केवळ ११ टक्के बसच्या फेऱ्या झाल्या आहेत. राज्यातल्या २५० पैकी तब्बल २१८ आगारातून एकही बस रस्त्यावर धावली नाही.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील सुमारे २५० पेक्षा अधिक आगारातील एसटी वाहतूक बंद ठेवली आहे. स्थानिक पोलिसांच्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. एकूण २४,९२१ पैकी केवळ २७०१ फेऱ्या झाल्या. मात्र आंदोलनामुळे आत्तापर्यंत एसटीचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. मात्र एसटीचा सुमारे २० कोटींहून अधिक महसूल बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे.
राज्यातील २५२ आगार प्रमुखांना स्थानिक पातळीवर पोलिसांनी बुधवारी सकाळी नोटीस पाठवली. पुणे जिल्ह्यात चाकण आणि सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, वर्धा, अमरावती, उस्मानाबाद याठिकाणी २५ जुलै रोजी ३५० हून अधिक एसटी बसेसची तोडफोड करण्यातत आले होते. सुमारे २५०हून अधिक एसटी गाड्या जाळण्यात आल्या होत्या. त्यामुळे यावेळी २५० आगारांनी खबरदारी घेतली. याचा फटका सर्वसामान्यांना बसला.