मुंबई : Raj Thackerays activists in a letter : 27 फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिवस'  (Marathi Bhasha Gaurav Divas) म्हणून साजरा केला जातो. हा मराठी भाषा दिवस जोरदार आणि भव्य पध्दतीने साजरा करा, असे निर्देश मनसे कार्यकर्त्यांना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे दिले आहेत. संपूर्ण राज्यात या दिवसाच्या निमित्ताने मराठीमय वातावरण करा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा, असे राज यांनी म्हटलेय. (Marathi Bhasha Gaurav Divas : Raj Thackeray's instructions to activists in a letter)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात 'मराठी भाषा गौरव दिवस' म्हणून साजरा करतो. 'गौरव दिवस'. पूर्वीही दिनदर्शिकेत किंवा कॅलेंडरमध्ये हा दिवस होता. परंतु तो दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची पध्दत आपण, आपल्या पक्षानी सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू केली. हा आपल्या भाषेचा 'गौरव' दिवस आहे, तो त्याच जोशात, त्याच दिमाखात आपल्या शहरात, गावात, प्रत्येक भागात, प्रत्येक प्रभागात, प्रत्येक विभागात जोरात साजरा व्हायला हवा, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.


आपली भाषा आहे म्हणून आपण आहोत. आपली भाषा आपल्या सर्वांना ओळख देते. त्यामुळेच आपल्या एका महान, गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव त्याच जोरदारपणे साजरा झाला पाहिजे. लक्षात ठेवा की मराठी भाषकांनी या देशाच्या फार मोठ्या भागावर आपलं राज्य एकेकाळी प्रस्थापित केलं होते. या भाषेचा वचक संपूर्ण देशात होता. ज्या भाषेनं कित्येक मोठे साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक दिले, त्या भाषेचा 'गौरव' दिवस आहे हा.


संत ज्ञानेश्वरांपासून, संत तुकाराम, चोखामेळा, गोरोबा कुंभार अशी संत मंडळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारखी द्रष्टी माणसं, स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा राजगुरूंसारखे क्रांतीकारक, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांच्यासारखे समाजाला जागं ठेवणारे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, गाडगे महाराज, लोकमान्य टिळक, कर्मवीर भाऊराव पाटील, अशी किती किती नावं घ्यायची? पण, या सर्वा-सर्वांची भाषा मराठी आणि अर्थात सर्वात महत्त्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचीही भाषा मराठीच, असे या राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.