मेघा कुचिक, झी मराठी, मुंबई :  मुंबईत (Mumbai) दुकानांवर मराठी पाट्यांच्या (Marathi Boards) अंमलबजावणीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला आहे. यामुळे मुंबईतील दुकानदारांना (Shopkeepers) आपल्या दुकानांवर मराठीत पाट्या लावाव्याच लागणार आहेत. मुंबईत दुकानांवर मराठीतून पाट्या लावण्यासाठी दिलेली मुदत शुक्रवारी, 30 सप्टेंबरला संपली आहे. ही मुदत जरी काल संपली असली तरी मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) सोमवार म्हणजे 3 ऑक्टोबरपासून मराठी पाट्या न लावलेल्या दुकानांवर कारवाईचा बडगा उगारणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुकानांवर मराठी पाट्या न लावल्यास रोख रक्कम दंड आणि दंड न भरल्यास न्यायालयाच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई (Legal Action) सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दुकानांवर मराठी पाट्या लावण्याच्या पालिकेच्या निर्णयाला फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने (Federation of Retail Traders Welfare Association) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. परंतु सर्वोच्च न्यायालयाने या निर्णय अंमलबजावणीला स्थगिती देण्यासाठी नकार दिला आहे. 


50% दुकानांवरच मराठी पाट्या
मुंबईत सुमारे 5 लाख दुकाने आहेत. उपलब्ध माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात आतापर्यंत 50 टक्के इतक्याच दुकानांवर मराठी पाट्या लावलेल्या दिसत आहेत. म्हणजे अद्यापही 50 टक्के दुकानांवर मराठी पाटी लागल्या नसल्याचं पालिकेच्या तपासणीतून समोर आलं आहे.


नियम काय सांगतो ?
२०१८ च्या निर्णयानुसार दहा किंवा दहापेक्षा जास्त कामगार अससेल्या दुकानांवर मराठी पाट्या असणं बंधनकारक होतं. मात्र नव्या नियमानुसार कर्मचार्‍यांची संख्या विचारात न घेता फलक मराठी भाषेतच असणे बंधनकारक करण्यात आलं आहे.