असा राहिला शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचा जीवनपट
आई वडील, बहीण सगळेच कौस्तुभच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि कौस्तुभ २०१३ साली लष्करात रुजू झाले.
मुंबई : मोठं झाल्यावर सैनिकच व्हायचं आणि देशासाठी लढाई करायची.. लहानपणापासूनच कौस्तुभ यांचं हे स्वप्न होतं. शाळेतही कौस्तुभ इतर गोष्टींमध्ये रमायचा नाही, सैनिक सैनिक खेळण्याकडेच त्याचा कल असायचा असे त्यांच्या शाळेतील शिक्षकही सांगतात. मीरारोडमधल्या हॉलिक्रॉस हायस्कुलमध्ये कौस्तुभ यांचं शिक्षण झालं तर दहीसरच्या शैलेंद्र कॉलेजमधून त्यानी पदवी घेतली. त्यांचा सैन्यात जाण्याचा निर्धार पक्का होता. कौस्तुभ यांची आई ज्योती राणे मालाडच्या उत्कर्ष मंदिर शाळेत शिक्षिका. आईनं मुलाच्या स्वप्नाला साथ दिली पण तरीही सैन्यात जायचं म्हटलं की आईच्या मनात प्रचंड घालमेल व्हायची. आई वडील, बहीण सगळेच कौस्तुभच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि कौस्तुभ २०१३ साली लष्करात रुजू झाले.
२०१५ साली लग्न
२०१५ साली त्यांचं लग्न झालं...लष्करातला पती असल्याचा कौस्तुभच्या पत्नीलाही अभिमान होता. लग्नानंतर कौस्तुभचं कोलकात्यात पोस्टिंग होतं, तेवढा काळ ती कौस्तुभबरोबर राहिली पण २०१६ मध्ये कौस्तुभ यांचं जम्मू काश्मीरमध्ये पोस्टिंग झाल्यावर त्यांची पत्नी आणि मुलगा मुंबईत आले. त्यांना दोन वर्षांचा अगस्त्य नावाचा मुलगा आहे. अगस्तचा जन्म झाला तेव्हा 'राणेंच्या घरी छोटा कॅप्टन जन्माला आला' अशी घरच्यांची प्रतिक्रिया होती.
आईची इच्छा पूर्ण
२०१६ मध्ये काश्मीरला रुजू झाल्यापासून छोट्या मोठ्या लढाया कौस्तुभ यांनी हाताळल्या होत्या.. त्यात ते यशस्वीही झाले. जानेवारीत त्यांना सेना पदकानं गौरवण्यात आलं. तेव्हापासून तर त्यांचा उत्साह आणखी वाढला. मुलगा सैन्यात असल्यानं आईला सतत धाकधूक असायची. एप्रिलमध्ये कौस्तुभ सुट्टी घेऊन घरी आल्यावर गणपतीपुळ्याला जाऊन येण्याची आईची इच्छा त्यांनी पूर्ण केली.
जुलै महिन्यापासूनच काश्मीरमधल्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचं ऑपरेशन सुरू होतं. कौस्तुभ त्या मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग होते. रोज घरी फोन करुन सुरक्षित असल्याचं ते सांगत पण अखेर दहशतवाद्यांची गोळी त्यांना लागलीच आणि जे स्वप्न कौस्तुभ यांनी लहानपणापासून पाहिलं, त्याच स्वप्नासाठी त्यांनी आयुष्य वेचलं.
अशी मिळाली बढती
२०१३ मध्ये काश्मीरमध्ये कॅप्टन कौस्तुभ राणेंचं पोस्टिंग
२०१४ मध्ये लडाखमध्ये पोस्टिंग
२०१५ मध्ये कोलकातात पोस्टिंग
२०१६ नोव्हेंबरमध्ये काश्मीरमधल्या गुरेजमध्ये पोस्टिंग
२६ जानेवारी २०१८ मध्ये राणेंचं मेजरपदी बढती