दिनेश दुखंडे / देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या नव्या मातोश्री या निवासस्थानी राहायला जाण्यास सज्ज आहेत. उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातलं हे घर असल्याचं म्हटलं जातंय. काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेने ठाकरेंना भोगवटा प्रमाणपत्र (NOC) हस्तांतरीत केलं आहे. १२ ऑक्टोबरला हे भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आलं. तर अग्निशमन दलाचं ना हरकत प्रमाणपत्र २८ सप्टेंबरला देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी या इमारतीचा प्लॉट २०१६ मध्ये ११.६० कोटी रुपयांना खरेदी केला. ५८ लाख रूपये स्टॅम्प ड्युटीही त्यांनी अदा केली. हा प्लॉट आधी कट्टीनगेरी कृष्णा हेब्बर यांच्याकडे होता. तो उद्धव ठाकरे यांनी विकत घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१९ च्या अखेरीस ठाकरे कुटुंब मातोश्री-२ मध्ये राहण्यास जाण्याची शक्यता आहे. 'मातोश्री -२'च्या सहा मजल्यांसाठी सीसी महापालिकेनं दिलेलं आहे. उर्वरित दोन मजल्यांसाठी परळ येथील एका एसआरए प्रकल्पाचा टीडीआर विकत घेण्यात आला. त्यावर व्यवहारावर महापालिकेनं आक्षेप घेतला. आयुक्त अजोय मेहता यांनी ते प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी पाठवलं. त्यानंतर फडणवीस यांनी या इमारतीला विशेष परवानगी दिली. टीडीआर व्यवहाराला परवानगी मिळाल्यानंतर इमारतीची मार्गिका ९ मीटर करण्यात आली. येणाऱ्या वर्षात ठाकरे कुटुंबाचा मातोश्री - २ मध्ये सहवास वाढेल.


'मातोश्री - २'ची इमारत

कसा असेल 'मातोश्री - २', जाणून घ्या.... 


- सध्याच्या, कलानगरच्या मूळ 'मातोश्री'च्या अगदी समोरच ही इमारत उभारली गेलीय 


- या इमारतीच्या बांधकामासाठी १० हजार चौरस चौरस फुटांचा बंगला उद्धव ठाकरे यांनी ११ कोटी ६० लाख रुपये किमतीला विकत घेतला


- २०१६ साली त्याबाबतच्या सर्व व्यवहारांची पूर्तता करण्यात आली 


- या इमारतीचे वास्तू विशारद नवशेर तलाठी आहेत, तर विकासक प्लॅटिनम इन्फ्रास्ट्रक्चर आहेत


- इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं असलं तरी अंतर्गत सजावट आणि फर्निचर मंडणीसाठी आणखी एक वर्ष लागण्याची शक्यता आहे


- तळ मजल्यासह एकूण आठ मजल्यांची ही इमारत आहे


- या इमारतीत ३ ड्युप्लेक्स फ्लॅट आहेत. ज्यामध्ये, पाच शयनगृहे, स्टडी रूम, होम थिएटर, स्विमिंग पूल, अत्याधुनिक व्यायामशाळा, स्वयंपाक घरे, प्रशस्त हॉल यांचा समावेश आहे


- इमारतीचे दोन प्रवेशद्वार आहेत. एक कलानगरचे मुख्य प्रवेश द्वार असेल दुसरं बीकेसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे 


- प्रत्येक माळ्यावर ठाकरे कुटुंबातील एकाचं वास्तव्य असेल


'मातोश्री' अपूरं पडतंय म्हणून...


- १९ जून १९६६ दादरच्या कदम मेन्शनमधील घरात शिवसेनेची स्थापना करण्यात आली


- ८० च्या दशकात बाळासाहेब ठाकरे कुटुंबासह वांद्र्यातील कला नगरात 'मातोश्री' राहायला आले


- 'मातोश्री - २' हे ठाकरे कुटुंबात अंतर्गत कलहाचेही कारणही ठरलंय... नुकताच कुटुंबातील संपत्ती वाद संपुष्टात आलाय 


- या इमारतीला 'मातोश्री - २' हे नाव शिवसैनिकांनीच देऊन टाकलंय... या नावानेच ही वास्तू ओळखली जावी अशी भावना त्यांनी व्यक्त केलीय... कारण 'मातोश्री' या नावाशी शिवसैनिकांचे भावनिक नातं खूप जूनं आहे


- १९९५ ला युतीचे सरकार आल्यानंतर मूळ सद्य 'मातोश्री'चं नूतनीकरण करण्यात आलं होतं... यावेळी, तळ मजल्यासह तीन मजली बंगला उभारण्यात आला होता


- आता मूळ 'मातोश्री'त जागा अपुरी पडू लागल्याने मातोश्री - २ ची निर्मिती करण्यात आली 


- आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, नव्या वास्तूच्या निर्मितीनंतरही शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानाचं म्हणजेच मूळ 'मातोश्री'च्या आठवणी जपल्या जाणार आहेत