मुंबई : विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दहावी बारावीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी चिथावल्या प्रकरणी आणि मुंबईतल्या धारावीत आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदुस्थानी भाऊच्या मागे कोणी राजकीय संस्था आहे का. तसंच त्याला आर्थिक मदत कुठून मिळाली याचा याचा तपास करायचा असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं. त्यासाठी हिंदुस्थानी भाऊच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. 


ऑडिओ क्लिप व्हायरल
हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकला अटक झाल्यानंतर त्याच्या समर्थकांची एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे.  क्लिपमध्ये  हिंदुस्थानी भाऊच्या समर्थनासाठी धारावी पोलिस स्टेशनमधे जमण्याचा संदेश देण्यात आला आहे.  जास्तीत जास्त मुलींना जमण्याचं आवाहन केलं जात आहे.  मुली असतील तर पोलिस मारणार नाहीत, असं वक्तव्य या ऑडियो क्लिपमधे आहे. 


शालेय शिक्षणमंत्री निर्णयावर ठाम
परिक्षा ऑफलाईनच होतील, पूर्ण विचारांतीच हा निर्णय घेतलाय असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. एकानं आवाहन केलं आणि मुलं एवढ्या संख्येनं एकत्र आली. पण यामागे कोण आहे हे शोधलं पाहिजे. गृह विभाग यावर काम करतंय अशी माहिती त्यांनी दिली.  जे हिंदुस्तानी भाऊला समर्थन करतायेत त्यांनी आपण कोणाला समर्थन देतोय हे पहावं असा सल्लाही वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. 


हिंदुस्थानी भाऊला भाजपचं समर्थन
दुसरीकडे भाजपचे मोहित कंबोज आणि आशिष शेलार यांनीं हिंदुस्तानी भाऊला समर्थन दिलं आहे. विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असून जर कोणी विद्यार्थ्यांची समस्या मांडत असेल तर राज्य सरकारने त्याकडे गांभीर्याने पाहायला हवं, याउलट राज्य सरकारने हिंदुस्थानी भाऊवर केलेली कारवाई चुकीची असून त्याला सोडलं नाही तर आम्ही आंदोलन करू अशी भूमिका मोहित कंबोज यांनी मांडली आहे.


तर, भाजप नेते आशिष शेलार यांनीही हिंदुस्थानी भाऊला अटक केल्याच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. अकरा हजार कोटीच्या प्रीमियमची खैरात बिल्डरांवर करणाऱ्या ठाकरे सरकारने विद्यार्थ्यांची फी फी माफ करायला काय हरकत आहे. परिक्षांबाबतचा असंतोष विद्यार्थी रस्त्यावर येऊन सांगत असतील तर त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला काय हरकत आहे, हिंदुस्तान भाऊ ला अटक करून तुमची यातून सुटका होणार नाही अशी टीका शेलार यांनी केली आहे.