MHADA कडून मोठी घोषणा! मुंबईत अत्य अल्प, अल्प, मध्यम उत्पन्न गटासाठी 2500 घरं
MHADA 2024 Scheme: मागील बऱ्याच वर्षांपासून चर्चेत असलेल्या भूखंडावर अखेर म्हाडाने घरं बांधण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात मंडळाकडून अधिकृतपणे माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही घर अल्प, अत्य अल्प आणि मध्यम गटासाठीची आहेत.
MHADA 2024 Scheme: परवडणाऱ्या घरांचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी म्हाडाकडून आता पुन्हा एकदा मोठ्याप्रमाणात मुंबईकरांसाठी घरांची घोषणा करण्यात आली आहे. गोरेगाव आणि पहाडी येथे नुकतीच अडीच हजार घरं बांधून पूर्ण करणाऱ्या म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून गोरेगावमध्ये नवीन गृहप्रकल्प हाती घेतला जाणार आहे. गोरेगाव पश्चिममधील सिद्धर्थ नगर म्हणजेच पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत प्राप्त झालेल्या भूखंडावर म्हाडाने अडीच हजार घरांचा प्रकल्प उभारण्याचं निश्चित केलं आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी ही घरं बांधली जाणार आहेत.
बिल्डरने अर्ध्यात सोडलेला प्रकल्प म्हाडाच्या ताब्यात
म्हाडाची ही घरं एकूण दोन टप्प्यांमध्ये उभारली जाणार असून पहिल्या टप्प्यात 1500 तर दुसऱ्या टप्प्यात 1000 घरं बांधली जाणार आहेत. यामधील पहिल्या टप्प्यातील निविदा काढण्याची तयारी मुंबई मंडळाने सुरु केल्याचे समजते. ठरल्याप्रमाणे पत्राचाळ म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासामधून मुंबई मंडळाला सोडतीसाठी बिल्डरकडून 2700 घरं उपलब्ध होणार होती. मात्र हा प्रकल्प बिल्डरनेच अर्ध्यात सोडल्याने रखडला. तर अन्य एका प्रकल्पामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला. हा प्रकल्प आर्थिक गैरव्यवहारामध्ये अडकल्याने सरकारने तो बिल्डरकडून काढून म्हाडाच्या ताब्यात दिला.
त्या 306 घरांचं काम अंतिम टप्प्यात
दरम्यान, बिल्डरने म्हाडाच्या वाट्यातील 306 घरांचं काम सुरू केल्यानंतर ते काम अर्ध्यात सोडलं. या अर्धवट घरांसाठी मंडळाने 2016 मध्ये सोडत काढलेली. हा प्रकल्प ताब्यात घेतल्यानंतर मुंबई मंडळाने आधी मूळ रहिवाशांच्या 672 घरांसह सोडतीतील घरे पूर्ण करण्याचे निश्चित केलं. हे काम 2022 मध्ये म्हाडाने हाती घेतले. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे.
पुढील काही दिवासांमध्ये निविदा काढणार
एकीकडे म्हाडाकडून हा रखडलेला प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने असताना आता मुंबई मंडळाने नव्याने अडीच हजार घरांची घोषणा केली आहे. म्हाडाने आपल्या वाट्याच्या अडीच हजार घरांची बांधणी करण्याचा निर्णय घेतला असल्याच्या वृत्ताला म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दुजोरा दिला आहे. पहिल्या टप्प्यातील दीड हजार घरांच्या बांधकामासाठी निविदा काढण्याची तयारी सुरू असून येत्या काही दिवसांमध्ये यासंदर्भातील निविदा म्हाडाकडून प्रसिद्ध केली जाईल, असं जयस्वाल यांनी सांगितलं आहे.
...म्हणून उच्च उत्पन्न गटातील घरांना बगल
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीमध्ये मागील बऱ्याच काळापासून उच्च उत्पन्न गटातील घरांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळेच म्हाडाची या गटातील महागडी घरे अनेकदा रिक्त राहात आहेत. त्यामुळेच मुंबई मंडळाला मोठे आर्थिक नुकसान होत आहे. म्हणूनच आता म्हाडा प्राधिकरणाने प्रामुख्याने अल्प, अत्य अल्प आणि मध्यम गटातील घरांना प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे. तसेच मुंबईतील उच्च गटातील घरांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर करण्याचा विचार सुरु असल्याचे वृत्त आहे. या संदर्भात लवकरच प्राधिकरणाकडून अंतिम निर्णय होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.