मुंबईत घराचे स्वप्न लवकरच होणार पूर्ण! MHADA च्या 4083 घरांसाठी असा करा अर्ज
Mhada Lottery 2023: म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत जाहीर झालेल्या चार हजार 86 घरांसाठी सोमवारपासून अर्ज करता येणार आहे. म्हाडाच्या घरांच्या सोडतीसंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइनच केली जाणार आहे. त्यामुळे यामध्ये कोणताही हस्तक्षेप नसणार आहे.
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मुंबईत (Mumbai News) स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या कुटुंबांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. तब्बल चार वर्षांनंतर सोमवारपासून मुंबईकरांना म्हाडाच्या 4086 घरांच्या सोडतीसाठी (Mhada Lottery 2023) अर्ज करता येणार आहेत. 18 जुलै रोजी या लॉटरीचा निकाल लागणार आहे. या घरांसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार सोमवारी दुपारी 3 वाजल्यापासून म्हणजेच 22 मे पासून ऑनलाइन किंवा म्हाडाने तयार केलेल्या अॅपद्वारे नोंदणी करू शकतात. 26 जून रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही नोंदणीची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
कुठे आहेत ही घरे?
मुंबई मंडळाच्या सोडतीत एकूण 4083 सदनिकांचा समावेश आहे. यात अत्यल्प उत्पन्न गटासाठी 2790, अल्प उत्पन्न गटासाठी 1034, मध्यम उत्पन्न गटासाठी 139 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 120 सदनिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहत.
अत्यल्प उत्पन्न गटात पहाडी गोरेगाव पश्चिम येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1947, अॅन्टॉप हिलमध्ये 417 तर, विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये 424 अशा एकूण 2790 घरांची सोडत होणार आहे. तर अल्प उत्पन्न गटात एकूण 1034 सदनिका असून त्यातील 736 सदनिका गोरेगावमधील पहाडी येथे तर उरलेली घरे लोकमान्य नगर दादर, अँटॉप हिल वडाळा, सिद्धार्थनगर - गोरेगाव पश्चिम, डीएन नगर -अंधेरी, पंत नगर -घाटकोपर, कन्नमवार नगर विक्रोळी, चारकोप कांदिवली, महावीर नगर कांदिवली, जुने मागाठाणे बोरिवली, गव्हाणपाडा मुलुंड, पीएमजीपी मानखुर्द, मालवणी मालाड या ठिकाणी आहेत.
मध्यम उत्पन्न गटासाठी 140 सदनिका असून या उन्नतनगर गोरेगाव पश्चिम, महावीर नगर कांदिवली, जुहू, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, सहकार नगर चेंबुर, लोकमान्य नगर दादर, अँटॉप हिल वडाळा, भायखळा, टिळकनगर चेंबुर, चांदिवली पवई, गायकवाड नगर मालाड, प्रतीक्षा नगर सायन, चारकोप कांदिवली येथे आहेत.
उच्च उत्पन्न गटामध्ये 120 सदनिकांचा समावेश असून या जुहू अंधेरी पश्चिम, वडाळा पश्चिम, ताडदेव, लोअर परळ, शिंपोली कांदिवली, तुंगा पवई, चारकोप कांदिवली, सायन पूर्व येथे असणार आहेत.
उत्पन्नाची मर्यादा किती?
अत्यल्प उत्पन्न गटाकरता (EWS)वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपर्यंत आवश्यक आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता (LIG) वार्षिक उत्पन्न नऊ लाख रुपयापर्यंत असणे आवश्यक आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता (MIG) बारा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न आवश्यक आहे. तर उच्च उत्पन्न गटाकरिता (HIG) कमाल उत्पन्न मर्यादा नसणार आहे.
मात्र चारही उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित करण्यात आलेली नसली तरी अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठीच अर्ज करू शकतात.
प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांची किंमत ही केंद्र व राज्य शासनाचे प्रती सदनिका अडीच लाख रुपये इतके अनुदान वजा करून निश्चित केली आहे. या सोडतीत विकास नियंत्रण नियमावली 33(5) अंतर्गत प्राप्त सदनिका, विकास नियंत्रण नियमावली 33(5) अंतर्गत बांधकाम चालू असलेल्या सदनिका, मुंबई मंडळांतर्गत विखुरलेल्या सदनिकांचा समावेश आहे.
म्हाडाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
या सदनिका विक्री करता मंडळाकडे साचेबद्ध कार्य प्रणाली कार्यरत आहे. मंडळाने सदनिकांच्या विक्री करता किंवा तत्सम कोणत्याही कामासाठी कोणालाही प्रतिनिधी/ सल्लागार/ प्रॉपर्टि एजेंट/ मध्यस्थ/ दलाल म्हणून कोणालाही नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर आर्थिक व्यवहार करू नये. तसे केल्यास मंडळ अथवा म्हाडा प्रशासन जवाबदार राहणार नाही. अशाप्रकारे कोणी व्यक्ति/ दलाल काही प्रलोभने देऊन फसवणूक करत असल्याचे आढळल्यास त्यांनी म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी तसेच उपमुख्य अधिकाऱ्यांना याबाबत माहिती द्यावी.
तसेच या सोडतीविषयक सविस्तर माहितीसाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच अर्ज करताना अर्जदारांना येणाऱ्या अडचणींसाठी मार्गदर्शनासाठी 022-694681000 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे.
ही कागदपत्रे तयार ठेवा
आधार कार्ड
पॅन कार्ड
अधिवास प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
प्रतिज्ञापत्र