मुंबई : म्हाडाची घरं म्हटली म्हणजे सामान्यांच्या स्वप्नातली घरे. मात्र, या घरांच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. म्हाडाचे ४७५ चौरस फूटांचं घर दोन कोटी रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे सामान्यांचे स्वप्न अधुरे राहणार आहे. दरम्यान, म्हाडाच्या महागड्या घरांबाबत गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी संतापजनक विधान करत सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केले आहे. ज्यांना घ्यायची आहेत आणि ज्यांना परवडतील ते घरे घेतील, असे ते म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षीप्रमाणे यंदाही म्हाडाची जाहिरात आली. मात्र ही जाहिरात खूषखबर नव्हे तर संतापाच्या भावना घेऊन आली. कारण यंदा म्हाडाच्या घरांचे दर भोवळ आणणारेच आहेत. सामान्यांचं म्हाडा आता श्रीमंतांचं होत चालले आहे.


मुंबईत म्हाडाची घरं म्हटली म्हणजे सामान्यांच्या स्वप्नातली घरं. कारण खासगी बिल्डरच्या घरांचे दर त्यांच्या उंचच उंच इमारतींसारखेच आकाशाला भिडणारे आहेत. त्यामुळंच मुंबईत घर हवं असेल तर सामान्यांना आधार आहे तो म्हाडाचा. मात्र आता म्हाडानंही उंच टॉवर बांधायला सुरूवात केल्यापासून त्यांच्या घरांचे दरही आकाशाला स्पर्श करू लागले आहेत. 


यंदा केवळ ८१९ घरांसाठी म्हाडाची जाहिरात निघाली. यातल्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे २०० पेक्षा जास्त घरांचे दर हे दीड कोटीपेक्षा जास्त आहेत.  लोअर परळमध्ये उच्च उत्पन्न गटासाठी ३६ घर आहेत. यातली ४७५ चौरस फुटांची दोन घरं आहेत. या घरांचा दर १ कोटी ९५ लाख ६७ हजार रूपये एवढा आहे. तर इतर ३६३ चौरस फुटांच्या ३४ घरांचा दर १ ४२ लाख ९६ हजार एवढा आहे. तर पवईच्या तुंगा परिसरात १६८ घरं उभारण्यात आली आहेत. या घरांचा दर ही डोळे फिरवणारा आहे. तुंगा परिसरातल्या घरांचा दर १ कोटी ३९ लाख रुपये एवढा आहे. 
 
उच्च उत्पन्न गटासाठी मासिक उत्पन्नाची मर्यादा ७५ हजारांपेक्षा जास्त ठेवण्यात आली आहे. मात्र या घरांचे दर पाहता महिना ३ लाख रुपये उत्पन्न असलेल्यांनाच ही घरं परवडणार आणि त्यांनाच बँकाही कर्ज देणार. मात्र या निकषानुसार राज्यातला सर्वोच्च पदावर असलेल्या केवळ पगारावर जगणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यालाही हे घर परवडणार नाही. इतररांनी तर स्वप्नही पाहू नये. त्यामुळे याला लॉटरी म्हणायचं की लूट हा प्रश्न सामान्यांना पडलाय. 


कोट्यवधींच्या किमतीची ही घर व्यापा-यांसाठी उभारली आहेत की मोठ्या गुंतवणूकदारांसाठी असा प्रश्न म्हाडाची जाहिरात पाहिल्यानंतर सर्वांनाच पडणार आहे. भाजप सरकार परवडणा-या घरांचा नारा देत असंत. मात्र गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या गृहनिर्माण खात्यानं म्हाडाच्या उद्देशांना हरताळ फासण्याचंच काम केलंय. त्यामुळे आता म्हा़डाही खासगी बिल्डरच्या पावलावर पाऊल टाकत उच्चभ्रू, व्यापारी आणि श्रीमंतांसाठीच यापुढे घरांची निर्मिती करणार की काय असं चित्र यंदाच्या जाहिरातीतून निर्माण झालंय.