म्हाडाच्या लॉटरीत पराभूत तरी मिळणार मुंबईत घर! 442 जणांचं नशीब फळफळलं; नेमकं घडलंय काय पाहा
Mhada Mumbai Lottery: म्हाडाच्या घरांना यंदा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
Mhada Mumbai Lottery: महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा)ने मुंबई मंडळासाठी 2030 घरांची लॉटरी काढली होती. या लॉटरीमुळं अनेक मुंबईकरांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. ज्या अर्जदारांचे म्हाडाच्या सोडतीत नाव आलं नाही त्या 442 जणांनाही म्हाडाचे घर लागले आहे. मुंबई मंडळाच्या 442 लॉटरी विजेत्यांनी म्हाडाला घर परत केले आहेत. विजेत्यांनी घर परत करण्याचा निर्णय घेतल्याने वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या उमेदवारांनी घराची लॉटरी लागली आहे.
म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजेत्यांनी घर म्हाडाला परत केल्यानंतर वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या अर्जदारांना एसएमएसच्या माध्यमातून माहिती देण्यात येईल. त्यानंतर वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या अर्जदारांना घर विकत घेण्याची संधी मिळेल. म्हाडाने लॉटरी विजेत्यांना 20 ऑक्टोबरपर्यंत घरं स्विकारण्याची मुदत दिली होती.
मुंबई मंडळाने 2030 घरांसाठी 8 ऑक्टोबर रोजी सोडत जारी केली होती. 2030 घरांसाठी 1,13,811 जणांनी अर्ज दाखल केला आहे. अनेक लॉटरी विक्रेत्याने एकाहून अधिक घर लागली आहेत. मात्र, नियमांनुसार विजेता एकाहून अधिक घर खरेदी करु शकत नाही. यामुळं या लॉटरीच्या माध्यमातून विजेत्यांना एका पेक्षा अधिक घर स्वीकारता येत नाही. एक घर सरेंडर करावे लागते.
मुंबईत घरांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. सर्वसामान्यांना परवडतील अशी घर घेण्यासाठी म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहावी लागते. मात्र तरीही काही जण या घरांसाठी किंमतीची जुळवाजुळव करु शकत नाहीत. त्यामुळं अनेकांनी घरं परत केली आहेत. तर, काहींना बँकेतून कर्ज न मिळाल्याने घरं परत केली आहेत. 2023मध्ये 333 लॉटरी विजेत्यांनी म्हाडाची घरे परत केली आहेत. त्यामुळं ही घरे म्हाडाने 2024च्या लॉटरीत समाविष्ट केली आहेत.
2024च्या लॉटरी प्रक्रियेत सुरुवातीला म्हाडाला कमी प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर म्हाडाने खासगी बिल्डरांकडून 370 घरांच्या किंमती 15 ते 25 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर अर्जदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती.