मुंबई :  पोलीस विभागाच्या परीक्षेत डमी उमेदवार बसवल्याचं उघड झालं. त्यानंतर आता म्हाडा परीक्षा भरतीतही (Mhada Recruitment Exam Scam) बोगस उमेदवार बसवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नागपूर, नाशिक आणि बीडमध्ये मोठी कारवाई केली आहे. (mhada recruitment exam scam police arrested to bogus candidate) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हाडा भरती परीक्षा घोटाळा उघड झाल्यानंतर आता या घोटाळ्याचं विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र कनेक्शन समोर येत आहे. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत नाशिक, नागपूर आणि बीडमधून बोगस उमेदवारांना अटक केली आहे.



नाशिकच्या इंदिरा नगरमधील परीक्षा केंद्रावर बोगस उमेदवार बसवण्यात आले होते. परीक्षार्थींपैकी एकानं इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस लपवल्याची माहिती मिळताच त्याची झडती घेण्यात आली. चौकशीअंती त्याचं ओळखपत्र आणि इतर कागदपत्रं बनावट असल्याचं निष्पन्न झालं. याप्रकरणी पोलिसांनी ज्ञानेश्वर डिघुळे या आरोपीला ताब्यात घेतलं आहे.


तिकडे नागपुरातही एमआयडीसी पोलिसांनी अभिषेक भारतराव सावंत या तरूणाला अटक केलीय. तो मुळचा बीडमधील आहे. म्हाडात वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपीक पदाची भरती 8 फेब्रुवारीला  सुरू होती. त्यात सावंत हा दुसऱ्याच परीक्षार्थीची परीक्षा देण्यासाठी आला होता. उपअभियंते लांबपुसे यांना संशय आल्यानं त्यांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्याचं बिंग फुटलं.


म्हाडा परीक्षा भरती घोटाळ्याप्रकरणी बीडमध्येही कारवाई करण्यात आलीय. वडझरी इथल्या राहुल सानप या उमेदवाराच्या जागी परीक्षा देण्यासाठी आलेल्या डमी उमेदवाराला शिवाजी नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


अर्जुन बिलाल बिघोट असं या डमी उमेदवाराचं नाव असून तो शहरातील दिशा कॉम्प्युटर या म्हाडा परीक्षेच्या परीक्षा केंद्रावर आला होता. या धडक कारवाईमुळे डमी उमेदवारांचं बिंग फुटलंय. आता त्यांच्या चौकशीतून इतरही बड्या धेंडाची नावं समोर येण्याची शक्यता आहे.