मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मंत्रीमंडळातील नेते अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांच्याबाबत अपशब्द वापरले आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सुप्रिया सुळेंनी (supriya sule) केलेल्या टीकेवरुन सत्तार यांना प्रश्न विचारला होता. त्यावर सत्तार यांनी थेट सुप्रिया सुळेंबाबत कॅमेरासमोरच अपशब्द वापरले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून राष्ट्रवादीने या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. राज्यभरातून सत्तार यांच्या विधानावरुन संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मी महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. आमच्यामध्ये भांडण लावू नका. मी कोणत्याही महिलेला बोललो नाही. कोणत्याही महिलेचे मन दुखले असेल तर त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. पण जर आमच्याबद्दल कोणी कुणीतरी खोके नावाचा आरोप लावत असेल त्यांच्याबद्दल मी जे काही बोललो ती आमच्याकडील ग्रामीण भाषा आहे. महिलांच्या बद्दल मी एक शब्दही बोललो नाही," असे अब्दुल सत्तार म्हणाले.


अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद मुंबईतही पाहायला मिळाले. अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील बंगल्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धडक देत तोडफोड केली. याबाबतही अब्दुल सत्तार यांनी भाष्य केले. "बंगल्याच्या काचा कोणी फोडल्या तर मला भीती वाटत नाही. मी पुन्हा सांगतोय की महिलांच्या बद्दल अपशब्द वापरला नाही. कोणाच्याही भावना दुखावणारे शब्द बोललो नाही. देशातील किंवा महाराष्ट्रातील महिलांची मने दुखली असतील तर मी सॉरी म्हणतो," असेही अब्दुल सत्तार म्हणाले.


नेमकं काय म्हणाले अब्दुल सत्तार?


संभाजीनगरमधल्या सिल्लोड इथं खासदार एकनाथ शिंदे यांची आज जाहीर सभा होणार आहे. या सभेची सर्व तयारी अब्दुल सत्तार बघत आहेत. यावेळी अब्दुल सत्तार यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला.  सुप्रिया सुळेंनी 50 खोके मिळाले का, असा प्रश्न अब्दुल सत्तारांना केला होता. यावर सत्तारांनी तुम्हालाही द्यायचे का, असा प्रतिप्रश्न केला होता. सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर देत तुमच्याकडे असल्यानेच तुम्ही ऑफर करत असल्याची टीका केली होती. यावर बोलताना सत्तार यांची जीभ घसरली. सुप्रिया सुळे यांचा एकेरी उल्लेख करत 'इतकी भिकारxx झाली असेल तर तिलाही देऊ' असं वादग्रस्त वक्तव्य सत्तार यांनी केलं आहे. जे आम्हाला खोके बोलतात त्यांच्या डोक्यात खोके भरले असल्याची टीकाही सत्तार यांनी केली आहे.