मुंबई : आता नव्या मुख्यमंत्र्यांसोबतच राज्याला नव्या मिसेस मुख्यमंत्रीही मिळणार आहेत. आता वर्षावर गृहमंत्री असतील रश्मी वहिनी... फडणवीस सरकारच्या काळात अमृता वहिनी नेहमीच चर्चेत राहिल्या. आता या नव्या वहिनी कशा असतील? याचीच चर्चा रंगलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पलट के आऊंगी शाखों पे खुशबुएँ लेकर, खिजां की जद में हूँ मौसम जरा बदलने दे!' असं भावनिक ट्विट करत अमृता फडणवीस यांनी वर्षावरुन पॅक अप करायला आता सुरुवात केली असावी... तर दुसरीकडे, रश्मी ठाकरेंची आता मातोश्रीवरील आपला संसार 'वर्षा' या बंगल्यावर हलवण्यासाठी लगबग सरु झाली असावी.



माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या गेली पाच वर्ष सतत चर्चेत राहिल्या. कधी त्यांचा अल्बम, कधी त्यांचं क्रूझवरील फोटेसेशन तर कधी त्यांचं अमिताभ समवेतचं गाणं किंवा परदेशातील त्यांचा परफॉर्मन्स... त्यांच्याआधीच्या इतर 'मिसेस मुख्यमंत्र्यां'पेक्षा अमृता फडणवीस वेगळ्या होत्या. नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या... कौतुकाबरोबरच कधी-कधी त्यांच्यावर टीकाही झाली. मात्र, त्यांनी याची कधीही तमा बाळगली नाही.


डावीकडे रश्मी ठाकरे, उजवीकडे अमृता फडणवीस

आता अमृता फडणवीस यांना वर्षा बंगला सोडावा लागणार आहे... तर आतापर्यंत 'मातोश्री'वर ज्यांचा दरारा होता त्या रश्मी वहिनी आता 'वर्षा' बंगल्याचा ताबा घेणार आहेत. या नव्या रश्मी वहिनी तशा शिवसैनिकांना आणि मुंबईतील सेनेच्या कार्यकर्त्यांना चांगल्याच ठाऊक आहेत. मात्र, आता ही 'महाविकास आघाडी' असल्यानं त्यांना जरा अधिकच भाव मिळणार आहे.


'मातोश्री'वर येणाऱ्या-जाणाऱ्यांचा अगदी आदरातिथ्यानं पाहुणचार करणाऱ्या आणि वेळप्रसंगी उद्धव यांनाही 'योग्य' तो सल्ला देणाऱ्या रश्मी वहिनी आता चर्चेत येतील. आता वर्षावरुन उद्धव ठाकरे राज्याचा गाडा कसा हाकतात? याकडे जसं जनतेचं लक्ष लागलंय तसंच राज्याच्या या 'मिसेस मुख्यमंत्री' वर्षावर कसं राज्य करतात याकडेही सर्वांचं लक्ष असेल.