Mumbai Crime News : नोव्हेंबर 2021 रोजी पालघर (Palghar News) येथील सदिच्छा साने (Sadichha Sane) नावाची तरुणी परीक्षेसाठी घरातून बाहेर पडली मात्र घरी परतलीच नाही. त्यानंतर आता जवळपास दोन वर्षांनी एमबीबीएसची (MBBS) विद्यार्थ्यीनी असलेल्या सदिच्छाचे अपहरण (kidnap) केल्याप्रकरणी एका 32 वर्षीय लाईफगार्डला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शनिवारी सांगितले की 22 वर्षीय सदिच्छा साने ही आरोपींसोबत शेवटची दिसली होती. तेव्हापासून सदिच्छाचा शोध लागलेला नव्हता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय घडलं?


मुंबईच्या जे. जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेज मध्ये सदिच्छा साने ही तिसऱ्या वर्षात शिकत होती. 29 नोव्हेंबर 2021 रोजी ती परीक्षेसाठी जातेय सांगून घराबाहेर पडली होती. यावेळी सकाळी 9.58 वाजता ती विरार स्टेशनवरून ट्रेनमध्ये चढली आणि अंधेरीला उतरली. त्यानंतर ती दुसऱ्या ट्रेनमध्ये बसली आणि वांद्रे येथे उतरली. त्यानंतर तिने वांद्रे बँडस्टँडला जाण्यासाठी रिक्षा घेतली. मोबाईल फोनच्या लोकेशनवरून ती दुपारपर्यंत त्याच परिसरात फिरत असल्याचे उघड झाले होते.


अपहरण केल्याप्रकरणी एकाला अटक


त्यानंतर गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री वांद्रे येथून सदिच्छाचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली मिथू सिंग याला ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर मिथू सिंगला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नागपाडा पोलिसांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आरोपींच्या नार्को आणि ब्रेन मॅपिंग चाचण्या केल्या होत्या पण त्यात काहीही सापडले नव्हते. मात्र आता पोलिसांनी मिथु सिंगला अटक केली आहे.


पोलिसांच्या चौकशीत आरोपी मिथु सिंगने त्या दिवशी घडलेल्या प्रसंगाबाबत माहिती होती. त्या दिवशी माझी ड्युटी वांद्रे बॅंडस्टँडवर होती. सदिच्छाला एकटी पाहून ती आत्महत्या करण्यासाठी आली असावी असा संशय मला आला. यामुळे मी तिच्याकडे गेलो. त्यावेळी सदिच्छाने मी तिथे जीव द्यायला आलेली नाही असे सांगितले. यानंतर आम्ही दोघेही एका खडकावर बसलो आणि बोलू लागलो. त्यानंतर मी सदिच्छासोबच मुलीसोबत चार सेल्फी काढले, अशी माहिती मिथु सिंगे दिली होती.


जेव्हा सदिच्छा बेपत्ता झाल्याची बातमी आली तेव्हा मिथु सिंगने पोलिसांकडे त्याचा जबाब नोंदवला नाही. जेव्हा पोलिसांनी त्याच्यासोबत संपर्क साधला तेव्हा त्याने माहिती दिली आणि आपण तिच्यासोबत बोलल्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 363 (अपहरण) आणि 364 (ई) (खंडणीसाठी अपहरण) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


"माझी मुलगी 29 नोव्हेंबर 2021 रोजी परीक्षेसाठी घराबाहेर पडली होती. त्यानंतर दुपारी ती वांद्रे बॅंडस्टँड येथे गेल्याची सीसीटीव्हीमध्ये दिसली. मुलगी परीक्षेसाठी पोहोचली नसल्याचा संध्याकाळी कॉलेजमधून फोन आला. यानंतर आम्ही बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर रात्री वांद्रे पोलीस ठाणे गाठून मुलीचे लोकेशन पोलिसांना दाखवले. त्यानंतर आम्ही आसपास चौकशी केली. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी मिथु सिंगकडे चौकशी केली नाही. वारंवार मागणी करुन सुद्धा माझ्या मुलीची फाईल पोलिसांनी पाहिली नव्हती," अशी माहिती सदिच्छाच्या वडिलांनी दिली.