गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : ठाण्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक उद्या एक बिबट्या दत्तक घेत आहेत. त्यांचे पूत्र, युवासेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये उद्या हा दत्तकविधानाचा कार्यक्रम होतो आहे. तुम्हालाही असे प्राणी दत्तक घेता येऊ शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्याच्या घोडबंदर परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी बिबट्याचा बछडा सापडलं होता. आपल्या आईपासून दुरावलेला हा बछडा सध्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक या बछड्याला दत्तक घेणार आहेत.


नॅशनल पार्कमध्ये 'प्राणी दत्तक योजनेमध्ये अशा पद्धतीनं प्राणी दत्तक घेता येतात. कर्नाटकातील बनेरगट्ट बायोलॉजिकल पार्कमध्ये सर्वात आधी ही दत्तक पद्धत राबवण्यात आली. २०१३ सालापासून मुंबईच्या राष्ट्रीय उद्यानातही ही योजना सुरू झालीये. यामध्ये आतापर्यंत 9 बिबटे दत्तक देण्यात आले आहेत. अभिनेता सुमित राघवन, रामदास आठवलेंचे पूत्र जित, संदीप पाटील, साधना वझे, प्रशांत कर्णिक अशा अनेकांनी प्राणी दत्तक घेतले आहेत. 



या दत्तक योजनेमध्ये नागरिकांना आपल्या आवडीचा वन्यप्राणी निवडावा लागतो. त्याला दत्तक घेण्यासाठी मुख्य वनरक्षक आणि संचालकांकडे अर्ज करावा लागतो. हा प्राणी संपूर्ण वर्षासाठी दत्तक घेता येतो. ही योजना राबवण्यासाठी तीन अधिकऱ्यांची टीम काम करते. अर्थात प्राणी दत्तक घेतला तरी त्याची मालकी शासनाकडेच राहते. दत्तक घेणाऱ्या व्यक्तीचं नाव त्याच्या पिंजऱ्याजवळ लावलं जातं. आठवड्यातून एकदा या प्राण्याला निःशुल्क भेट देता येते. दत्तक घेणाऱ्या व्यक्तीला प्राण्याचा आहार, औषध, पिंजरा किंवा आसपासच्या परिसराबाबत कोणतीही अट ठेवता येत नाही. प्राणी दत्तक घेण्याचं रेटकार्डही उद्यानाने तयार केलं आहे. 


वर्षानुसार खर्च


सिंह - ३ लाख
वाघ - ३ लाख १० हजार 
बिबट्या - १ लाख २० हजार
वाघटी - ५० हजार, 
चितळ - २० हजार 
नीलगाय - ३० हजार 
भेकर - १० हजार 


प्राणी दत्तक घेण्यासाठी सेलिब्रेटी किंवा राजकीय नेता असलं पाहिजे असं मुळीच नाही. तुम्हालाही प्राण्यांविषयी प्रेम असेल, त्यांच्यासाठी काही करायची इच्छा असेल तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधायला हरकत नाही.