आमदार रामराव वडकुते यांनी मंत्रालयात प्रवेश करतांना पंकजा मुंडेंना रोखलं
पंकजा मुंडे यांना मंत्रालयात जाण्यापासून अडवलं
अमित जोशी, मुंबई : धनगर समाजाचे नेते आणि विधानपरिषदचे आमदार रामराव वडकुते यांनी आज मंत्रालयात प्रवेश करतांना पंकजा मुंडे यांना अडवलं. जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी मंत्रालयात प्रवेश करणार नाही असं जाहीर वक्तव्य पंकजा मुंडे यांनी नांदेडमध्ये केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आमदार वडकूते यांनी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश करतांना पंकजा मुंडे यांना रोखलं. तेव्हा पुरुष असता तर जाऊच दिलं नसतं अशी प्रतिक्रिया वडकुते यांनी यावेळी झी 24 तासशी बोलतांना दिली.
आम्ही पुन्हा सत्ता प्रस्थापित करणार आहोत. पण त्या सत्तेत विराजमान होत असताना धनगर आरक्षण दिल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश करू शकणार नाही. या माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. माझ्या या वक्तव्याचा विपर्यास केल्याची प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. आमदार रामराव वडकुतेंनी मला रोखण्यापेक्षा गेल्या ७० वर्षांत जे धनगरांना आरक्षण देऊ शकले नाहीत त्यांना रोखावं असं आव्हान दिलं आहे. मला रोखल्यामुळे धनगर आरक्षण मिळणार असेल तर खुशाल रोखावं अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही मिळणार नाही तोपर्यंत मंत्रालयाच्या दालनात प्रवेश करणार नाही. नांदेड जिल्ह्यातल्या माळेगावमध्ये खंडोबाची यात्रा सुरु आहे. यावेळी धनगर आरक्षण जागर परिषदेतलं पंकजा मुंडे यांचं हे विधान होतं. धनगर आरक्षणासाठी दिल्लीच नव्हे तर तुमच्यासोबत मेंढरामागे येण्याचीही तयारी पंकजा मुंडेंनी केली होती. या विधानाला २४ तास उलटत नाहीत. तोच पंकजा मुंडेंनी मंत्रालय गाठलं सुद्धा. मंगळवारी सकाळीच पंकजा मुंडे मंत्रालयात दाखल झाल्या. यावेळी धनगर समाजाचे नेते आणि विधानपरिषदचे आमदार रामराव वडकूतेंनी पंकजा मुंडेंना मंत्रालयाच्या पायरीवर अडवलं. पंकजा मुंडे पुरुष असत्या तर त्यांना जाऊच दिलं नसतं असं वडकूते यांनी म्हटलं.
एकीकडे काठी आणि घोंगडी घ्यायची आणि धनगर समाजाला आपलंसं करायचं आणि दुसरीकडे अशी स्टंटबाजी करायची, हे पटणारं नाही. जो शब्द २४ तासही पाळता येत नाही, तो शब्द द्यायचा कशाला. मतदारांनो, निवडणुका जवळ आल्या आहेत. स्टंटबाजांपासून सावधान...