`बंबई मेरी जान` वेब सिरीजच्या नावावरून मनसे आक्रमक` खळखट्याकचा इशारा
गुन्हेगारी जगताशी संबंधीत बंबई मेरी जान ही वेबसीरिज ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. मुंबईतील माफियाराजवर आधारीत ही वेबसीरिज आहे. पण प्रदर्शनापूर्वीच ही वेबसीरिज वादात सापडली आहे. मनसेने वेबसीरिजच्या नावावर इशारा दिला आहे.
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : 'बंबई मेरी जान' ही मुंबईच्या अंडरवर्ल्डशी (Underworld) संबंधित वेब सिरीज (Web Series) नुकतीच प्रदर्शित झाली आहे या वेब सिरीजच्या 'बंबई' नावावरून मनसे आक्रमक झाली आहे. निर्माता दिग्दर्शकांनी 'बंबई' (Bambai) हे नाव बदलावे अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करत हे नाव बदलण्यास भाग पाडू असा इशारा मनसे (MNS) चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे. यापूर्वी देखील चित्रपटांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'बंबई' या नावावरून मनसेने आक्रमक पवित्रा धारण करत अनेक दिग्दर्शकांना हे नाव बदलण्यास भाग पाडलेलं. त्यामुळे नुकतीच प्रदर्शित झालेली बंबई मेरी जान या वेब सिरीज निर्माता दिग्दर्शकांनाही नाव बदलण्याचा इशारा मनसे कडून देण्यात आला आहे
मनसेचे सरचिटणीस आणि मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी या संदर्भात एक पोस्ट लिहिली आहेय. यात त्यांनी म्हटलंय...
"नावात काय आहे?" असे शेक्सपियर म्हणून गेला.. परंतु, जे दिल्लीत आणि जे मुंबईत चालू आहे ते पाहता 'नावा'तच सर्व काही आहे असे वाटतं. फायदा कोणत्याही राजकीय पक्षाचा असो. परंतु, इंग्रजांना हुसकावून लावून 75 वर्षे झाली तरी जगाने आजही आपल्याला त्यांनीच दिलेल्या India ह्या नावाने ओळखावे ही गोष्ट बरी नाही. पण मग.. 'भारत' नाव बदलासाठी आग्रही असणारे लोक 'मुंबई' च्या नाव बदला संदर्भात इतके उदासीन कसे?
'क्रिएटिव्हिटीच्या' नावाखाली कितीही गरज पडत असेल, तरी आपल्या शहराच्या जुन्या नावाचे फलक गावभर लावणे आणि TOI सारख्या नामांकित जबाबदार वृत्तपत्राने आपली ओळख बदलून काही पैशांसाठी लाचारीने हे जुने नाव मिरवणे, हे सुद्धा अजिबात बरे नाही!
अहो 'बॉम्बे' आणि 'बम्बई' चे 'मुंबई' करण्यासाठी कित्येक लोकांनी किती परिश्रम केले हे आपण विसरलो का? राजकीय दस्तावेजांमधून अधिकृतरित्या जरी जुने नाव हद्दपार झाले असले, तरीही अमराठी आगंतुकांच्या वाणीवरून आणि मनावरून हे नाव पुसून टाकण्याचा लढा आजही चालू आहे. असो.. अजून मी ही वेब सिरीज पाहिलेली नाही. बघतोच! आणि मुंबई ऐवजी 'बंबई' वापरण्याची इतकी काय क्रिएटिव्ह गरज होती हेही बघतो. पटलं तर ठीक आहे. अन्यथा खळ्ळ खटॅक्क!!
काय आहे 'बंबई मेरी जान'मध्ये
कृतिका कामरा आणि अविनाश तिवारीची बंबई मेरी जान ही वेब सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होतेय. 1970 च्या दशकात मुंबईत वाढत्या माफियाराज वर ही वेबसीरिज आधारित आहे. लंडनमध्ये या वेबसीरिजचा ग्रँड प्रीमिअर नुकताचा पार पडला. बंबई मेरी जान ही एक फिक्शनल क्राईम सीरिज आहे. ही मालिका एका इमानदार पोलीस अधिकारी आणि गुन्हेगारी जगाताशी जोडलेल्या मुलाशी संबंधित आहे. भूक आणि गरिबीला कंटाळून मुलगा गुन्हेगारी जगतात प्रवेश करतो. इमानदर वडिल आणि गुन्हेगार मुलादरम्यानच्या लढ्याची ही कहाणी आहे.