Bmc Election 2022 : राज ठाकरे निवडणूक स्वबळावर लढणार, भाजप-शिंदे गटाशी युती नाहीच
Bmc Election 2022 : मुंबईसह आगामी प्रत्येक महापालिका निवडणुकांसाठी मनसेनं स्वबळाचा नारा दिलाय.
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) भाजप-शिंदे गटाशी हातमिळवणी करतील अशी चर्चा सुरु होती. पण आता या चर्चांना फुलस्टॉप मिळालाय कारण राज ठाकरे स्वबळावरच आगामी प्रत्येक निवडणूक लढणार आहेत. राज ठाकरेंनी हा निर्णय का घेतला, शिंदे-फडणवीसांसाठी हा धक्का आहे का, ठाकरेसेनेला दिलासा आहे का? पाहुयात एक रिपोर्ट. (mns chief raj thackeray decided to contest own for upcmoming bmc election 2022 see full report)
गणेशोत्सव काळात शिंदे गट, भाजपचे नेते आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी सुरु होत्या, फडणवीस-राज, शिंदे-राज भेटीगाठी झाल्या. त्यामुळे येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे भाजप-शिंदे गटासोबत युती करु शकतात अशी चर्चा होती. मात्र आता मनसेकडून शिंदे-भाजपसोबतच्या युतींना फुलस्टॉप मिळालाय.
मुंबईसह आगामी प्रत्येक महापालिका निवडणुकांसाठी मनसेनं स्वबळाचा नारा दिलाय. मुंबईत मनस सर्व २२७ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिलीय.
शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गट, भाजप आणि मनसे एकत्र येईल, मराठी मतांची पोकळी भरुन काढेल अशी चर्चा होती. पण मनसेनं आता एकला चलो रेचा नारा दिलाय. फक्त मुंबईच नाही तर ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद निवडणूकही मनसे स्वबळावर लढणार आहे.
सध्या तरी एकला चलो रेची घोषणा मनसेनं केलीय. मात्र प्रत्यक्ष निवडणुकांसाठी अजून बराच कालावधी बाकी आहे. यात एखादा ट्विस्ट आला तर नवल वाटायला नको.