केतकी चितळेने शरद पवारांबाबत केलेल्या पोस्टवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
अभिनेत्री केतकी चितळेच्या पोस्टवर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केतकी चितळेच्या पोस्टचा निषेध केला आहे. केतकी चितळे हिने काल शरद पवारांबाबत एक वादग्रस्त पोस्ट केली होती. तुकारामांच्या अभंगाचं विडंबन करुन शरद पवार यांच्यावर टीका केली होती.
फेसबुक पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळे चांगलीच वादात सापडली आहे. राष्ट्रवादीकडून तिच्या या पोस्टवर जोरदार टीका होत आहे.
राज ठाकरे पत्रात काय म्हणाले...
पाहा कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरूध्द तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो.. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत.! आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरूषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतानी आपल्याला शिकवलं! कोणीही ह्या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा! पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती ह्या खरंच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरू आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे ! कारण ह्या अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यांनाही समजलं असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच, राज्यसरकारनं ह्याचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा. आपला नम्र राज ठाकरे
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यातील एका सभेत जवाहर राठोड यांची एक कविता सादर केली होती. ज्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी ब्राह्मण समाज आणि हिंदू देवदेवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची टीका भाजपनं केली होती. त्यामुळेच केतकीनंही पवारांच्या कवितेवरुन निशाणा साधल्याचं बोललं जात आहे.