मुंबई: भविष्यात कोणत्याही राज्याला उत्तर प्रदेशातील कामगारांची गरज पडली तर त्यापूर्वी आमची परवानगी घ्यावी लागेल, असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी नुकताच दिला होता. योगींच्या या भूमिकेनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत योगींना प्रतिइशारा दिला आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील कामगार हवे असल्यास आमच्या सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल तर यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. त्याशिवाय महाराष्ट्रात पाऊल ठेवता येणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युपीमधील कामगार हवे असतील तर योगी सरकारची परवानगी बंधनकारक


तसेच महाराष्ट्र सरकारनेही या गोष्टींकडे गांभीर्याने पाहावे, असे राज यांनी म्हटले आहे. भविष्यात परराज्यातील कामगारांना महाराष्ट्रात प्रवेश देताना त्यांची नोंद करावी. पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि ओळख असली पाहिजे. तर त्यांना महाराष्ट्रात प्रवेश द्यावा, असे राज यांनी म्हटले आहे.



लॉकडाऊनमुळे रोजगार उरला नसल्याने गेल्या काही दिवसांत मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या शहरी भागांतील अनेक परप्रांतीय कामगारांनी आपल्या गावाची वाट धरली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात येणाऱ्या लोकांचा ओघ अचानक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आता योगी आदित्यनाथ यांनी संकटाच्या काळात मजुरांना वाऱ्यावर सोडल्याबद्दल महाराष्ट्र सरकारवर टीकास्त्र सोडले होते. तसेच राज्याबाहेर काम करणाऱ्या मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कठोर नियमांचा समावेश असलेले धोरण तयार करणार असल्याचे संकेत दिले होते. यामध्ये कामगारांच्या विम्याचे आश्वासन देखील द्यावे लागणार आहे. तसेच परप्रांतीय कामगारांच्या प्रश्नांबाबत एक खास आयोगाची  स्थापना करावी अशी मागणीही योगींनी केल्याचे समजते.