मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची भेट घेणार आहेत. या भेटीमागील कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, राज्यातील मंदिर उघडण्याची करण्याची मागणी ते करु शकतात, अशी शक्यता आहे. दरम्यान, राज ठाकरे हे एकप्रकारे राज्य सरकारला संदेश देण्यासाठीच ही भेट घेत असल्याचे बोलले जात आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील अनेक प्रश्नांवर भाजपचे नेते राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेत असतात. तसेच अलिकडेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पायल घोषसोबत भेट घेतली होती. त्याआधी कंगना रानौत हिनेही राज्यपाल यांची भेट घेतली होती. तसेच राज्यात मंदिरे सुरु करण्याच्या मुद्द्यावरुन राज्यपाल  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. त्या पत्रातून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना आम्हाला हिंदुत्व शिकविण्याची गरज नाही, असे उत्तर पत्र पाठवून दिले होते.


तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांच्या पत्रावर नाराजी व्यक्त करत थेट पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे राज्यपालांची भेट घेणार असल्याने जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 


दरम्यान, राज ठाकरे यांची विविध संघटना आणि पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली होती. त्यांच्याकडे आपले प्रश्न मांडले होते. यातील काही प्रश्न राज ठाकरे यांनी सरकारमधील संबंधित मंत्र्यांशी फोनवरुन चर्चा करुन सोडवले होते. तर काही समस्यांसाठी राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. मात्र, आता राज ठाकरे हे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.