Filmfare Awards 2024 : बॉलीवुड चित्रपटसृष्टीत सर्वात प्रतिष्ठेचा मानला फिल्मफेअर पुरस्कार सोहळा लवकरच पार पडणार आहे. यंदा या फिल्मफेअर फेस्टिव्हलचे 69 वे वर्ष आहे. दरवर्षी हा पुरस्कार सोहळा मुंबईत आयोजित केला जातो. मात्र, यंदा गुजरात टुरिझमच्या सहकार्याने गिफ्ट सिटी येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत अनेक वर्षे होत कार्यक्रमाचे गुजरातमध्ये आयोजन करण्यात आल्याने महाराष्ट्रातील विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात भाष्य केल्यानंतर आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी देखील या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपट जगतातील सर्वात जुना आणि लोकप्रिय फिल्मफेअर पुरस्कार यंदा मुंबईबाहेर होणार आहेत. 2023 चा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा 28 जानेवारी 2024 रोजी गुजरातची राजधानी गांधीनगर येथे होणार आहे.  गुजरात टुरिझमच्या सहकार्याने यावर्षी फिल्मफेअर पुरस्कारांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर फिल्मफेअर पुरस्कार नामांकनांची यादीही समोर आली आहे. मात्र हा पुरस्कार सोहळा आता गुजरातमध्ये होणार आहे.


यावरुन आता फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पारंपारिक ठिकाण मुंबईऐवजी गुजरातमध्ये आयोजित करणे हा राज्याच्या राजधानीचे महत्त्व कमी करण्याचा आणि चित्रपट उद्योगाला बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे, असे विरोधकांनी म्हटलं आहे. या निर्णयामुळे सिने कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार आहे. आधी महाराष्ट्रातील उद्योग मुंबईबाहेर हलवण्यात आले आणि आता महायुती सरकारची वाईट नजर मुंबईतील चित्रपट उद्योगावर पडली आहे, असे विरोधकांनी म्हटलं आहे. मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत इशारा दिला आहे.


"कितीही प्रयत्न करा, कितीही ताकत लावा पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. भारतीय सिनेमाचा बाप, आदरणीय दादासाहेब फाळके हे मराठी होते. एका मराठी माणसामुळे भारतात सिनेमाचा जन्म झाला. फक्त महाराष्ट्राला हीणवण्यासाठी आज गुजरात गुजरात करत असाल तरी तुमचा दाणा - पाणी मुंबईतच आहे हे विसरू नका," असा इशारा शालिनी ठाकरे यांनी दिला आहे.


 



याआधी जितेंद्र आव्हाड यांनीही सोशल मीडिया पोस्टद्वारे सरकारवर निशाणा साधला होता. "भारतीय चित्रपटसृष्टी आणि मुंबई यांचे नाते जवळ-जवळ 100 वर्ष जुने आहे. याच मुंबईत अनेक कलावंत, गायक, अनेक चित्रपट,  अनेक गाणी तयार झाली. भारतातील सर्वाधिक सिनेमागृहे याच शहरात होती. पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या कुटुंबाने याच चित्रपटसृष्टीतून कोट्यवधी रूपये कमावले. भाजीपावच्या गाडीवर काम करणारा अक्षय कुमार याला या मातीचा स्पर्श होताच तो अब्जाधीश झाला. किती नावे घ्यावीत; घेऊ तेव्हढी कमीच आहेत. या मराठी मातीच्या परिसस्पर्शामुळे चित्रपटसृष्टीची भरभराट होत गेली. निदान या कलाकारांनी तरी या मातीची ओळख ठेवायला हवी होती. फिल्मफेअर अॅवाॅर्ड मुंबईतून हलवला जात आहे. त्याविरोधात एकही कलावंत ब्र उच्चारण्यास तयार नाही. म्हणजेच, मराठी मातीचा उपयोग फक्त या लोकांनी स्वतःचे खिसे भरण्यापुरतेच केला. एकेकाची घरे शंभर - दीडशे कोटींची आहेत. त्यांनी हे पैसे मेहनतीने कमावले; पण, या मातीतूनच कमावले, हे देखील महत्वाचे आहे. थोडी तरी या शहराबद्दल प्रेम- आपुलकी असती तर एखादा कलाकार तरी बोलला असता. पण, कोणी बोलेल, असे दिसत नाही. 105 हुतात्म्यांनो, माफ करा आम्हाला ! तुम्ही अतिशय मेहनतीने मुंबई महाराष्ट्राला दिली. या मुंबईने देशाला पोसले. या मुंबईने आंतरराष्ट्रीय प्रतिमा निर्माण केली; जगात एक स्वतःची ओळख निर्माण केली. त्या मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे काम जर झालं असेल आणि आम्ही मराठी माणूस, मग तो कुठल्याही जाती-धर्माचा का असेना तो जर शांत बसत असेल तर तुम्हा हुतात्म्यांना नक्कीच वाटत असेल की, आम्ही कशाला छातीवर गोळ्या झेलल्या? माफ करा आम्हाला!," असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.