मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारच्या वतीनं पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ७ जणांना पद्म विभूषण, १६ जणांना पद्म भूषण तर ११८ जणांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर तसेच अदनान सामी यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पण अदनान सामीला पद्मश्री देण्यास मनसेनं तीव्र शब्दात विरोध दर्शवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरेश वाडकर यांना पद्मश्री मिळाल्याचा आनंद साजरा करतोय पण अदनान सामीला दिलेल्या पद्मश्रीमुळे या आनंदावर विरझण पडल्याची टीका मनसे नेते अमेय खोपकर यांनी केली आहे. २०१५ मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं आणि लगेच चार वर्षात त्याला पद्मश्रीही बहाल केला. त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. 




मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.



त्यामुळे त्याला बहाल केलेल्या पद्मश्री पुरस्काराचा मनसेकडून निषेध नोंदवण्यात आला आहे. अदनान सामीला जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्वरित रद्द करावा अशी मागणी मनसेने केली आहे.