कृष्णा हेगडे यांच्यानंतर आणखी एका राजकीय नेत्याकडून रेणू शर्मावर हनीट्रॅपचा आरोप
भाजपाचे नेते कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा या महिलेविरोधात आपण तक्रार देणार असल्याचं सांगितल्यानंतर, मनसेचे नेते
मुंबई : भाजपाचे नेते कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा या महिलेविरोधात आपण तक्रार देणार असल्याचं सांगितल्यानंतर, मनसेचे नेते मनिष धुरी हे देखील तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत. कृष्णा हेगडे आणि मनिष धुरी यांनी म्हटलं आहे की, ही महिला मैत्री करण्यासाठी पुढे येते, आणि असं वाटतं की, ही महिला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करते. धनंजय मुंडे यांच्यावर या रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचे आरोप केले आहेत.
या प्रकरणी कृष्णा हेगडे यांनी म्हटलं आहे की, धनंजय मुंडे यांच्यात आणि माझ्यात मैत्री नाही. मी त्यांना ते आणि मी आमदार असताना दोन तीन वेळेस भेटलो असेल. एका महिलेने असं कुणासोबत गंभीर आरोप केलेले आहेत, असं होवू नये, यासाठी मी तक्रार करण्यास पुढे आलो असल्याचं कृष्णा हेगडे यांनी म्हटलं आहे.
हा माझ्यासाठी राजकीय मुद्दा नाहीय, मला हे पाहायचं नाहीय की, कोणता पक्ष आहे, आणि कुणावर काय आरोप, जे काही सत्य आहे आणि यापुढे कुणाची फसवणूक व्हायला नको, यासाठी मी सर्वांसमोर येऊन हे सांगतोय, आणि पोलिसांमध्ये तक्रार देत आहे, असं कृष्णा हेगडे यांनी म्हटलं आहे.