लोकसभा निवडणूक लढवण्यास मनसे नेते अनुकूल
राज ठाकरे यांच्या मनसेलाही आता निवडणुकांचे वेध लागलेत.
मुंबई : राज ठाकरे यांच्या मनसेलाही आता निवडणुकांचे वेध लागलेत. लोकसभा निवडणूक लढवण्यास मनसेचे नेते अनुकूल आहेत. मुंबईत वांद्रे इथल्या एमआयजी क्लबमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे नेते आणि सरचिटणीस उपस्थित होते. आगामी निवडणुकांची व्यूहरचना ठरवणं आणि लोकसभा निवडणूक लढवण्याबत पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.
मनसे नेते आणि पदाधिकारी ही निवडणूक लढवण्यासाठी अनुकूल असल्याचे या बैठकीतून समोर आलंय. मात्र अंतिम निर्णय राज ठाकरे हे घेणार आहेत. याबाबत पक्षाच्या नेत्यांच्या बैठका होतील अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिलीय. तसंच राज ठाकरे यांचे सर्वच पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध असून आगामी निवडणुकांमध्ये कुणाशी युती होणार हे काळच ठरवेल असंही नांदगावकर म्हणालेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्यात.
2014 सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर मनसेचे अनेक बडे नेत्यांनी पक्ष सोडला होता. नुकतेच शिशिर शिंदे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तर मुंबई महापालिकेतल्या नगरसेवकांनीही शिवसेनेची वाट धरली. याशिवाय जळगावमधील 12 मनसे नगरसेवक फुटीवरही या बैठकीत चर्चा झाल्याचं नांदगावकरांनी सांगितलंय. ते सर्व नगरसेवक दीड वर्षापासून पक्षाच्या संपर्कात नसल्याचंही ते म्हणालेत.
राज ठाकरेंची भूमिका काय?
मनसे यापुढे लोकसभा निवडणूक लढणार नाही. देशाचा कारभार राष्ट्रीय पक्षांनी चालवावा आणि राज्यातली सत्ता प्रादेशिक पक्षांकडे असावी, अशी आपली भूमिका असल्याचं राज ठाकरे 2014 साली म्हणाले होते. पण आता मनसेचे नेतेच लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अनुकूल असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या भूमिकेकडे मनसेच्या नेत्यांचं लक्ष लागलं आहे.