भारत म्हणजे काही धर्मशाळा नाही; मनसेचा रविवारी `महामोर्चा`
घुसघोरांविरूद्धच्या मोर्चासाठी मनसेची जोरदार तयारी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी महामोर्चाचं आयोजन केलं आहे. पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना मुंबईसह महाराष्ट्रातून हाकलण्याच्या मागणीसाठी मनसेने या मोर्चाचं आयोजन केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं जातं आहे.
महामोर्च्याची सुरवात राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ११.५५ वाजता हिंदू जिमखाना येथून सुरु होणार आहे. त्यानंतर हा मोर्चा आझाद मैदानावर पोहोचणार आहे. मनसेनं या मोर्चाला घुसखोरांविरुद्धच्या लढाईचंच स्वरूप दिलं असून भारत म्हणजे काही धर्मशाळा नाही असं आपल्या पोस्टरमध्ये म्हटलं आहे. या मोर्चा संदर्भात मनसेच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहेत.
मनसेचा हा महामोर्चा दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा हा मोर्चा असणार आहे. या मोर्चात मुंबईसह महाराष्ट्रातून जनता सहभागी होणार आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांची योग्य ती व्यवस्था केली जाणार आहे. तसेच महामोर्चात सहभागी होणाऱ्या सगळ्या नागरिकांनी शिस्त पाळायची असल्याचं आवाहन देखील यामधून केलं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मनसे मराठीच्या मुद्यावर राजकारण करत होतं. पण आता मनसेने आपल्या ट्रॅक बदलला आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाच्या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा झेंडा बदलला आहे. हा झेंडा बदलूनच त्यांनी हिंदूत्वाची भूमिका घेतली.