महाराष्ट्र सेवक ते हिंदवी रक्षक, मनसेचा प्रवास कट्टर हिंदुत्वाकडे - पाहा Video
राज ठाकरे यांचा पुन्हा एकदा कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार
Raj Thackeray : मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा कट्टर हिंदुत्वाचा (Hindutva) पुरस्कार केला. पुण्यात पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहीमेच्या उद्धाटनात याच आशयाचे बॅनर झळकले. 'आता भारत नाही, हिंदुंचा हिंदुस्थान' असं छापलेलं भलंमोठं होर्डिंग लावण्यात आलं होतं.
सोहळ्याला राज ठाकरेंचं आगमन झालं तेव्हा आवर्जून भगव्या रंगाच्या झिरमिळ्यांची बरसात करण्यात आली. एवढंच नव्हे, तर प्राथमिक सदस्य नोंदणीच्या ठिकाणी 'मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक' हे नवं घोषवाक्यही छापण्यात आलंय. नोंदणी केल्यानंतर मोबाईलवर येणाऱ्या आयकार्डवरही हे घोषवाक्य लिहिण्यात आलंय...
एकेकाळी मराठी माणसासाठी परप्रांतियांना पिटाळून लावणाऱ्या मनसेच्या घोडदौडीला 2014 पासून ब्रेक लागला होता. सर्वप्रथम मशिदीवरील भोंग्यांविरोधात आवाज उठवून राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं. त्यानंतर सातत्यानं हिंदुत्ववादी भूमिका मांडत त्यांनी आपला प्रवास हिंदुत्वाच्या दिशेनं सुरू केलाय.
आता पक्षाच्या घोषवाक्यातच हिंदवी रक्षकाचा उल्लेख करत राज ठाकरेंनी आपली भूमिका अधिक जहाल केलीये. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे शिवसेनेपासून दुरावलेले मात्र भाजपकडे जाण्याची शक्यता नसलेले मतदार आपल्याकडे वळवण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. त्यामुळे मनसेसाठी आगामी महापालिका निवडणुका (Corporation Election 2022) लिटमस टेस्ट ठरणार आहे.