मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज वाशी कोर्टात हजर राहणार
प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज वाशी कोर्टात हजर राहणार आहेत. 26 जानेवारी 2014 रोजी राज ठाकरे यांनी वाशी येथे केलेल्या भाषणात टोल नाके बंद करण्याचे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे आणि मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका इथे तोडफोड केली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी राज ठाकरे हे वाशी कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. राज ठाकरे हे कोर्टात हजर राहीले नसल्याने त्यांना समन्स बजावण्यात आले होते. आज सकाळी १० ते १०.३० दरम्यान राज ठाकरे वाशी टोल नाका इथे पोहचणार आहेत. त्यानंतर ११ पर्यंत राज ठाकरे हे वाशी कोर्टात हजर राहणार आहेत.
राज ठाकरे हे नवी मुंबई येणार असल्याने मनसेकडून जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तयारी सुरु केली आहे. अनेक ठिकाणी राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहे. मनसेने महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे.
राज ठाकरे हे पुढच्या महिन्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यानंतर त्यांचा महाराष्ट्र दौरा असणार आहे. राज्यात विविध ठिकाणी निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा आणि महाराष्ट्र दौरा चर्चेत आला आहे.