मुंबई : अमेरिकेतल्या जगप्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलवर University affairs at Harvard Business School (HBS) मराठीचा झेंडा फडकला आहे. भारतीय वंशाच्या श्रीकांत दातार यांची हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे नवे अधिष्ठाता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिमान व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हार्वर्डसारख्या सर्वोत्तम संस्थेचा प्रमुख एक मराठी माणूस असणं यासारखी अभिमानाची दुसरी बाब काय असणार असं ते म्हणाले आहेत. श्रीकांत दातार १ जानेवारी रोजी हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीन पदाचा पदभार स्वीकारतील.



राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?


| १० ऑक्टोबर २०२० जगातील 'हार्वर्ड बिझनेस स्कुल'च्या डीन पदी श्री. श्रीकांत दातार ह्या मराठी माणसाची निवड झाली आहे ही माझ्यासाठी आणि तमाम मराठी जनांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. १९०८ साली बोस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे स्थापन झालेली ही संस्था जगातील पहिल्या ५ नामांकित संस्थांपैकी आहे. आज असंख्य मराठी तरुण-तरुणी जेंव्हा परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी हार्वर्ड सारख्या ठिकाणी जाण्यासाठी धडपडत आहेत त्यावेळेस ह्या सर्वोत्तम संस्थेचा प्रमुख एक मराठी माणूस असणं ह्यासारखी अभिमानाची बाब दुसरी काय असणार.


श्री. श्रीकांत दातार ह्यांच्याविषयी वाचताना त्यांचा प्रवास थक्क करून गेला. चार्टर्ड अकाउंटंट- आयआयएममधून व्यवस्थापनाचं शिक्षण- स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पीएचडी-कार्नेजी मेलन येथे अध्यापन-पुढे स्टॅनफोर्ड येथे अध्यापन आणि आता हार्वर्ड बिझनेस स्कुलचे डीन. ह्या हार्वर्ड बिझनेस स्कुल मधून शिक्षण घेतलेल्या प्रथितयश विद्यार्थ्यांची नावं वाचताना महाराष्ट्रातील राहुल बजाज, आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम (जे सध्या महाराष्ट्राचं राज्यसभेत प्रतिनिधित्व करत आहेत) ह्यांच्या व्यतिरिक्त फारशी नावं आढळली नाहीत. भविष्यात इथून उत्तीर्ण होऊन जगात मराठीचा झेंडा फडकवणारी अनेक नावं निघू देत ही मनापासून इच्छा.


जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभं आहे, आज आपले अनेक मराठी तरुण-तरुणी कृत्रिम बुद्दीमत्ता, रोबोटिक्स, जेनेटिक्स मध्ये काम करत आहेत, अशा सगळ्या तरुण-तरुणींना श्रीकांत दातार ह्यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीत मराठी उद्योग सत्ता निर्माण व्हावी हीच इच्छा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे श्री. श्रीकांत दातार ह्यांचं मनापासून अभिनंदन. मराठी पाऊल असंच दिमाखात पुढे पडत राहो ही इच्छा. ___ राज ठाकरे