मुंबई : कांदिवली पूर्वमधील रायन इंटरनॅशनल स्कूल व्यवस्थापनाला मनसेने कडक इशारा दिलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाचे पत्र  सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्यावतीने  देण्यात आलेय.  येथे सुधारणा झाली नाही तर शाळेवर मनसेचा जागता पाहरा असेल, असा इशारा दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी शाळा मुख्याध्यापक व विश्वस्तांना लिहिलेलं आवाहनाचं पत्र आज आम्ही तुम्हाला देतोय. पण तरीही भविष्यात तुम्ही शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती पावलं उचलली नाहीत, तर मनसेचे पदाधिकारी तुमच्या शाळेवरच जागता पहारा ठेवतील, अशा शालिनी ठाकरे यांनी वादग्रस्त रायन इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापकांना इशारा दिला.


सात वर्षीय विद्यार्थ्याचा गळा चिरुन खून करण्यात आल्याने रायन इंटरनॅशनल स्कूल सध्या देशपातळीवर चर्चेत आहे. देशभरातील सर्व रायन इंटरनॅशनल स्कूलचे मुख्यालय कांदिवली ठाकूर संकुलातील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये आहे. मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज या शाळेचे वरिष्ठ प्रशासकीय व्यवस्थापक संतोष सावंत आणि प्रेम शेट्टी यांची भेट घेतली.


चर्चेच्या अखेरीस शाळेचे वरिष्ठ प्रशासकीय व्यवस्थापक संतोष सावंत यांनी शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणा तसंच इतर सर्व प्रकाराची सुरक्षाविषयक यंत्रणा यांमध्ये तत्काळ सुधारणा करु, असं आश्वासन मनसेच्या शिष्टमंडळाला दिलेय. 


याप्रसंगी मनसेचे विभागअध्यक्ष हेमंतकुमार कांबळे, दिनेश साळवी, वीरेंद्र जाधव, सुशांत माळवदे, अरुण सुर्वे आणि महिला विभाग अध्यक्षा आरती पवार, दीपिका पवार, सुनीता चुरी, वनिता घाग तसंच शाखाध्यक्ष किरण जाधव, संतोष भोर आदी बैठकीला उपस्थित होते.


दरम्यान, मनसे शिष्टमंडळ आणि शाळा व्यवस्थापन यांच्यातील बैठकीच्या निमित्ताने शाळेबाहेर आज पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला होता.