मुंबई : आज संध्याकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते मुंबई घाटकोपर इथे मनसे (MNS) कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. यानिमित्ताने घाटकोपर परिसरात पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सची सध्या चर्चा होत असून त्यावर राज ठाकरे यांचा 'हिंदुहृदयसम्राट' असा उल्लेख करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेने सध्या हिंदुत्ववादी भूमिका घेतली आहे. दोन वर्षांपूर्वी मनसेने झेंडा ही बदलला आहे. याआधी राज ठाकरे यांचा मराठी हृदटसम्राट असा उल्लेख केला जात होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना खडसावलं होतं, आता या पोस्टर्सवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


गेल्या अनेक दशकांपासून देशाने आणि महाराष्ट्राने एकच हिंदुहृदयसम्राट पाहिले आहेत ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. पण आता मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत राज ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट म्हटलं आहे. 


शिवसेनेने काँग्रेस आणि राष्टवादी काँग्रेसबरोबर हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. तेव्हापासून शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेल्याची टीका भाजपाकडून सातत्याने होत आहे. त्याच वेळेस मनसेने हिंदूत्वाचा मुद्दा अधिक जोराने लावून धरला आहे.


महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे कंबर कसून कामाला लागली आहे. स्वत: राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा करत पुणे, नाशिक औरंगाबादमध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मुंबईतही मनसे जोमाने कामाला लागली आहे. 


मनसेचे घाटकोपर विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. हिंदूहृदयसम्राटांचा वारसा राज ठाकरे हेच चालवू शकतात, मनसेच्या झेंड्याच्या रंगा भगवा आहे, झेंड्यात राजमुद्रा आहे, वेळोवेळी राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे हे सर्व अधोरेखित करण्यासाठी राज ठाकरे यांचा हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख केला आहे, असं गणेश चुक्कल यांनी म्हटलं आहे.