मनसे ६ नगरसेवकांचा रस्ता असा रोखणार
मुंबई महापालिकेत नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. मनसेचे मुंबईतील ६ नगरसेवक फोडून महापालिकेतली सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेनं खटाटोप सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे. मनसेचे ६ नगरसेवक फुटून नवीन गट तयार करत शिवसेनेला जाऊन मिळणार असल्याने मुंबईच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेत नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. मनसेचे मुंबईतील ६ नगरसेवक फोडून महापालिकेतली सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेनं खटाटोप सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे. मनसेचे ६ नगरसेवक फुटून नवीन गट तयार करत शिवसेनेला जाऊन मिळणार असल्याने मुंबईच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
दरम्यान, या प्रकरणी मनसेकडून आलेल्या प्रतिक्रियानुसार फुटून नवीन गट स्थापन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे नगरसेवकांना रोखणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले. दरम्यान, कोकण आयुक्तांना पत्र पाठवून असा गट करण्यापासून मनसे रोखणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आमच्या परवानगीशिवाय असे गट स्थापन करता येणार नाही असे मनसेकडून सांगण्यात आले आहे.
शिवसेनेकडून नगरसेवक खरेदीचा प्रयत्न सुरू असल्याचं पत्रच भाजप नेते खासदार किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहे. त्यातच मनसेचे काही नगरसेवक सध्या नॉट रिचेबल असल्याने या चर्चेला पुष्टी मिळाली आहे.
मुंबई महापालिकेत सध्या शिवसेनेची सत्ता असली तरी शिवसेना आणि भाजप यांच्या संख्याबळात केवळ एकचा फरक आहे. भांडूपमधील पोटनिवडणुकीत काल भाजपची नगरसेविका विजयी झाल्यानं भाजपचं संख्याबळ ८३ वर पोहोचले तर सत्ताधारी शिवसेनेचे ८४ नगरसेवक आहेत. त्यामुळं मनसेच्या नगरसेवकांना फोडून, सत्ता टिकवण्याचा आटापिटा शिवसेनेनं सुरू केल्याचे बोलले जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेतला सत्तासंघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे