मुंबई : पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेला अल्टीमेटम संपल्यावर मनसे कार्यकर्त्यांनी फेरिवाल्यांविरोधात मोर्चा उघडला. ठाण्यात मुंबई शहरातील काही भागात फेरिवाल्यांना मारहाण करत अनेक भागांतून त्यांनी हुसकवून लावले. मात्र, घाटकोपरच्या असल्फा मेट्रो स्थानकाजवळ काहीसे वेगळेच चित्र पहायला मिळाले. फरिवाल्यांना समजवायला गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांना उलट फेरिवाल्यांनीच समज दिल्याचे पहायला मिळाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेने सध्या फेरिवाल्यांविरोधात आंदोलन उभारले आहे. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांच्या रडारवर फेरिवाले आहेत. आंदोलनाचा भाग म्हणून मनसे कार्यकर्ते शहरातील विविध ठिकाणी फेरिवाल्यांविरोधात आक्रमक आहेत. दरम्यान, घाटकोपरमधील असल्फा मेट्रो स्थानकाजवळील फेरिवाल्यांना समज देण्यासाठी मनसे कार्यकर्ते गेले खरे. मात्र,  तिथे त्यांना फेरीवाल्यांनीच समज देऊन माघारी परतवलं. हा व्हिडिओ घाटकोपरमध्ये  सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. त्यामुळे निदान घाटकोपरमध्ये तरी फेरीवाल्यांच्या विरोधातील  मनसेचा बंड सध्या थंड झालेलं दिसतं आहे.


दरम्यान, मनसेच्या विरोधाला न जुमानणारे मुजोर फेरीवाले निदान पालिका आणि पोलीस प्रशासनाला तरी जुमानत असतील का, असाच प्रश्न आता विचारला जातोय. दरम्यान दादरमध्ये रस्त्यावरच्या फेरीवाल्यांच्या सुळसुळाटाविरोधात मनसेनं मूकमोर्चा काढाला. या मोर्चात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सामील झाले. यावेळी नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतलं.