मुंबई: भारत-चीन मुद्द्यावरुन देशातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाची 'ट्युन' मोदी सरकारनेच बदलायला हवी, असे मत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून व्यक्त करण्यात आले आहे. गलवान खोऱ्यात चीनच घुसखोरी आणि बेकायदा बांधकामे सुरुच आहेत. त्यांना सडेतोड उत्तर देण्याऐवजी सरकार पक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षालाच सडेतोड उत्तरे देत बसला आहे. चीन सीमेवर चौक्या आणि बंकर्स उभे करत आहे. मात्र, आपल्या देशात भाजप विरुद्ध काँग्रेस असे युद्ध रोज सुरु आहे. आपल्याला चीनशी लढायचे आहे, याचा बहुतेकांना विसर पडल्याची टिप्पणी 'सामना'तील अग्रलेखात करण्यात आली आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी चीनविषयी बोलतात  व त्यांचे लोक विरोधकांकडे वाकड्या नजरेने पाहतात, असे वातावरण सध्या देशात निर्माण झाले आहे. हे सर्व थांबवण्यासाठी मोदी सरकारनेच 'ट्युन' बदलायलाच हवी. विरोधी पक्ष काय आदळआपट करत आहे त्याकडे लक्ष देऊ नये. त्यांनी रोगाशी लढावे. रोग्यांशी लढून देशाचा वेळ आणि पैसा वाया घालवू नये, असा उलटा सल्लाही शिवसेनेने केंद्र सरकारला दिला आहे.

तसेच शरद पवारांनी देशाची सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा वैगेरे विषयांत राजकारण करु नये, असे बोलून राहुल गांधी यांना टोला लगावला या दाव्यातही तथ्य नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. पवारांनी हा टोला काँग्रेस किंवा राहुल गांधी यांना लगावला असे भाजपपुरस्कृत समाज माध्यमांवर पसरवले जात आहे. मात्र, पवारांचा हा टोला सरकारी पक्षालाही लागू पडतो. चीनप्रश्नी राजकारण कोणीच करु नये. पण राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीसंदर्भात विचारलेले प्रश्न म्हणजे पाण्यावरील बुडबुडे नाहीत. 

त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपण १९६२ पासूनच्या भारत-चीन संबंधांवर आपण संसदेत बोलायला तयार असल्याचे सांगितले. खरे म्हणजे, १९६२ पर्यंतच्या खोलात जायची गरज आहे का? विसरा तो भूतकाळ. चीनचे संकट नव्याने उसळले आहे व आपल्याला त्याच्याशी वर्तमानात सामना करुन राष्ट्राचे भवितव्य घडवायचे आहे. पंडित नेहरूंनी १९६२ साली चुका केल्या असतीलही, पण तुम्ही १९६२ सालात का रांगताय? आता २०२० उजाडून जग पुढे गेले आहे. चीनप्रश्नी आजच्या सरकारने ठाम भूमिका घेण्याची गरज आहे, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे.