मुंबई : कुर्ला येथे राहणा-या २४ वर्षीय मोनिका मोरेला आज ४ आठवडयानंतर मुंबईतील ग्लोबल रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येत आहे. तिच्यावर २८ आँगस्ट रोजी तब्बल १६ तास दोन्ही हातांच्या यशस्वी प्रत्यारोपण आणि खुप चांगली सुधारणा झाली असून ती पुढील नवीन आयुष्यासह सहा वर्षानंतर पुन्हा स्वांवलंबन जीवनाचा प्रयत्न करणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४ मध्ये घाटकोपर येथील रेल्वे अपघातात मोनिकाने तिचे दोन्ही हात गमावले होते. तिने कृत्रित हातांच्या सहाय्याने आपले दैनंदिन आयुष्य जगण्याचा प्रयत्न काही महिने केलाही, पंरतू त्वरीत तिला जाणवू लागले की प्रत्यक्षात निरूपयोगी असून ते एकप्रकारे भारच आहे.   


चेन्नई इथं एक ३२ वर्षीय युवक ब्रेन डेड झाल्यानंतर त्याचे हात मोनिकाला बसवले गेले. मध्यरात्री चेन्नई येथून विमानाद्वारे दोन्ही हात आणल्यानंतर डॉ निलेश सातभाईंच्या नेतृत्वात २० जणांची टिम मोनिकावर शस्त्रक्रिया केली.  मोनिकाला खरेखुरे हात लागावेत, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. परंतु त्यांचा दीड वर्षापूर्वी मृत्यू झाला. आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्वप्न पूर्ण झालंय.



दोन वर्षांपूर्वी तिने मुंबईच्या ग्लोबल रूग्णालयात दोन्ही हात प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली. अनेक प्रसंग असे आले की त्यावेळी मोनिकाला अवयव दात्यांकडून हात उपलब्ध होऊ शकले असते मेंदू मृत व्यक्तिच्या कुंटूंबियाकडून हात दान करण्यासाठी कोणी तयार होत नसल्याने ही शस्त्रक्रिया रखडली होती. परंतु, चेन्नईतील ३२ वर्षीय मेंदू मृत झालेल्या व्यक्तीच्या अवयवदानामुळे मोनिकाला नवीन हात मिळाले आहे. चॉर्टड विमानाने हे हात मुंबईत आणण्यात आले होते. रात्री उशीरा या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला सुरूवात करण्यात आली होती. साधारणतः १६ तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. आता ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून मोनिकाला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.


मुंबईतील ग्लोबल रूग्णालयातील कन्सल्टंट प्लॅस्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. नीलेश सातभाई म्हणाले की, ‘‘हात मिळत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून मोनिकाच्या दोन्ही हातांचे प्रत्यारोपण रखडले होते. पण आता हात मिळाल्याने तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. हातांचे प्रत्यारोपण ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असते. या शस्त्रक्रियेनंतर मोनिकाला प्रत्यारोपण अतिदक्षता विभागात एका वेगळ्या रूममध्ये ठेवण्यात आले होते. तसेच तिची काळजी घेण्यासाठी विलगीकरणासह एका नर्सची नियुक्ती देखरेखीसाठी करण्याची आवश्यकता होती. दोन्ही हातांना नियमित मलमपट्टी करण्यात आली. रूग्ण प्रत्यारोपणाच्या तिस-या दिवशी ती आपल्या खांद्याचा आधार घेऊन चालू व बसू लागली. याशिवाय दिवसातून दोनदा तिला फिजिओथेरपी दिली जात होती. हातांच्या हाडांना आधार मिळावा, यासाठी हाताच्या कोपऱ्यापर्यंत प्लास्टर करण्यात आला आहे.”


डॉ.सातभाई पुढे म्हणाले, “येत्या काही आठवड्यांत तिला कोपर हलवायला सांगितले जाईल. याशिवाय हात आणि बोटांनी ३-४ महिन्यांनंतर हालचाल सुरू होणे अपेक्षित आहे. तिच्या हाताचे स्नायूतील टिश्य आणि हाड तोपर्यत बरे होतील. रूग्णाला या काळात आपल्या दैनंदिन कार्य़ासाठी मदत घ्यावी लागेल. पण, एकदा तिच्या हातांची हालचाल आणि व्यायाम व फिजिओथेरपीव्दारे ती लवकरच अधिक अधिक स्वावलंबी होईल. तिच्या हातांच्या रिकव्हरीसाठी साधारण एक ते दिड वर्ष लागेल. हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला आता चार आठवडे पूर्ण झाले असून मोनिकाच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून तिच्या फक्त गोळ्या सुरू आहेत. रूग्ण खुप चांगल्या प्रकारे पुर्ववत होत असून उपचारांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे.  हे लक्षात घेऊन मोनिकाला आता घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, घरी गेल्यावरील तिला दररोज व्यायाम व फिजिथेरपी घेणं गरजेचं आहे.”


हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे मोनिकाला संसर्गाची शक्यता असल्याने कुटुंबियांना तिला भेटायला देता येत नव्हते. अशा स्थितीत कुटुंब तिच्याशी फोन व व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात होते. ”तसेच संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी तिला घरीही काही महिने वेगळे ठेवणे गरजेचे आहे. तसेच, कोरोना काळात पुर्णता काळजी घेत कोणत्याही सामाजिक अथवा गर्दीच्या वेळी बाहेर जाण्यास मनाई आहे. झी २४ तास तिच्या अपघातापासून ते तिला मदत मिळावी यासाठी पाठपुरावा केला आहे.


“मला नवीन हात मिळतील ,असा माझा ठाम विश्वास होता. आता माझं स्वप्न पूर्ण झाल्याने मी खूप आनंदी आहे. हात गमावल्याने कोणाच्याही लग्नात मला हाताला मेहंदी लावता येत नव्हती. पण आता मी पुन्हा मेहंदी लावू शकेन. याशिवाय, चित्र काढणे, आंघोळ करणे, स्वयंपाक आणि केस बांधणे ही काम मी स्वतः करु शकेन, याचा मला आनंद असल्याचे मोनिका म्हणाले. मिळालेल्या नव्या आयुष्यासाठी कुटुंबीय, अवयवदाता आणि डाँक्टरांचे मोनिका मोरेने आभार मानले.


ही यशस्वी शस्त्रक्रिया इतर अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रूग्णांना आशा मिळवून देईल आणि विशेषत: अन्य अवयवांसह हात दान करण्यासाठी ही लोक पुढाकार घेतील असे ग्लोबल रुग्णालयातील (मुंबई) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विवेक तलौलीकर यांनी सांगितले.