मुंबई : मोनोरेल प्रवाशांच्या पसंतीला उतरू लागलीय. मोनोचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर एका आठवड्यात मोनोने जवळपास एक लाख ९८ प्रवाशांनी प्रवास केला आहे. या प्रवाशांच्या माध्यमातून मोनोला ३६ लाखांचा महसूल मिळाला आहे. मोनो रेल्वेचा पहिला टप्पा सुरु झाला. मात्र, मोनोला चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. मोनो तोट्यात जात होती. त्यात मोनोचा झालेला अपघात, त्यानंतर मोनो रेल कित्येक महिने बंद होती. त्यामुळे आधाच तोटा आणि त्यानंतर चार ते पाच महिने बंद अशा कात्रीत सापडलेली मोनो आणि त्यानंतर दुसरा टप्पा लोकसभा निवडणुका जाहीर होण्यासाधी घाईघाईने सुरु करण्यात आली. मात्र, या मोनोला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.


चेंबूर-वडाळा-संत गाडगेमहाराज चौक हा मार्गाची अंमलबजावणी करण्यात आली. हा मार्ग सुरु झाल्यानंतर मोनो रेलला चांगले दिवस आले आहेत. मोनोला पहिल्या दिवसापासूनच प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून येत्या काळात प्रवासीसंख्या आणखी वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. मोनोची सतरा स्थानके असून सकाळी सहा ते रात्री दहा अशी मोनोची सेवा सुरू असते. मोनोचा दुसरा टप्पाही सुरू झाल्याने चेंबूर भागातील प्रवासी थेट दक्षिण मुंबईत येऊ शकतो. याआधी पहिला टप्पा हा चेंबूर ते वडाळा असा होता. मात्र, हा मार्ग प्रवाशांच्या सोयीचा नव्हता. त्यामुळे या मार्गाला प्रतिसाद मिळत नव्हता. केवळ पर्यटन म्हणून मोनोकडे अनेक प्रवसी पाहत होते. आता हा मार्ग चेंबूर ते सातरस्ता असा झाल्याने चांगला प्रतिसाद मिळत आहे.