मुंबई : राज्यात चक्रीवादळानंतर गेले दोन दिवस थांबून थांबून पाऊस पडत आहे. मात्र, संपूर्ण राज्यात मान्सून १० जूननंतर सक्रीय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविलाआहे. दरम्यान, चक्रीवादळानंतर केरळमधील मान्सूनची वाटचाल थांबली होती. ती आता पुन्हा सुरु झाली आहे. मान्सून पुढे सरकत आहे. गोव्यात आज आणि उद्या जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच पुढील २४ तासात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यास थोडासा उशीर होईल, असे सध्याच्या वाटचालीवरुन दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोवा राज्यात आज आणि उद्यो जोरदार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे. दरम्यान, याचवेळी समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे मासेमारीसाठी कोणीही समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. गोव्यात पाऊस १० जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
निसर्ग चक्रीवादळानंतर केरळमधील मान्सून  रखडला होता. आता केरळातील मान्सूनची प्रगती दिसून येत आहे. हा मान्सून पुढे सरकत आहे. पुढील तीन दिवसात मान्सून हा कर्नाटक, तामिळनाडू, पद्दुचेरी, बंगालच्या दिशेने वाटचाल करतआहे. आग्नेय तसेच मध्य-पश्चिम बंगालच्या खाडी किनाऱ्याचा भाग मान्सून व्यापून टाकेल, असा अंदाज आहे.


त्यानंतर गोव्यातून मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. गोव्यात आज आणि उद्या जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून पुढील २४ तासात मान्सून सक्रीय होईल आणि मान्सून महाराष्ट्राकडे वाटचाल करेल, असा अंदाज आहे. हा मान्सून १० जूननंतर संपूर्ण महाराष्ट्रात सक्रीय होईल. कोकण, कोल्हापूर, सातारा, पुणे, बारामती, औरंगाबाद, मालेगाव, जळगाव, अहमदनगर, परभणी, अकोला, अमरावती, नागपूर आदी ठिकाणी पावसाची शक्यता अधिक आहे.