मुंबई : जुलै महिन्यात जोरदार बरसल्यावर पावसाने सध्या उघडीप घेतली आहे. मात्र, पावसाचा जोर हा उद्यापासून पुन्हा पाहायला मिळणार आहे. उद्यापासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होण्याचा अंदाज, हवामान विभागाने वर्तविला आहे. पाऊस पडण्याची आवश्यक स्थिती निर्माण झाली. त्यामुळे पाऊस विश्रांतीनंतर पुन्हा बरसणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी अद्याप पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस नसल्याने पाणीसमस्या निर्माण झाली आहे. दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानपासून पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा आता दक्षिणेकडे सरकला आहे. ही पावसासाठी आवश्यक स्थिती आहे. त्यामुळे मान्सून सक्रीय होईल. मराठवाडा आणि विदर्भात म्हणावा तसा मान्सून झालेला नाही. येथे पाणीटंचाईचे सावट कायम आहे. मात्र, शुक्रवारपासून विदर्भातही पाऊस चांगला होईल, असा अंदाज आहे. मराठवाड्यातही पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होत आहे. आज कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा तर उर्वरीत राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 


दरम्यान, राज्यात मान्सूनचे उशिरा झालेले आगमन यामुळे राज्यात यंदा पावसाने सरासरी देखील गाठलेली नाही.  राज्यातल्या तब्बल २४ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला नाही. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने ओढ दिली आहे. विदर्भातील यवतमाळ आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे येथे पावसाची प्रतिक्षा कायम आहे.