मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर विमानसेवा देखील बंद करण्यात आली होती. हळूहळू विमानसेवा सुरु झाली आहे. पण लॉकडाऊन दरम्यान परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना वंदेभारत अभियानांतर्गत देशात आणलं गेलं. मुंबईत आतापर्यंत १२२० विमानांमधून १ लाख ३३ हजार १२५ नागरिक मुंबई विमानतळावर आले. ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत आणखी ८२ विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या ४३ हजार ९४५ आहे तर उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ४१ हजार ५९२ आहे. तसेच इतर राज्यातील ४७ हजार ५८८ प्रवासी हे मुंबई विमानतळावर आले होते.


वंदेभारत अभियानांतर्गत ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मले‍शिया,  कुवेत, अफगानिस्तान, ओमान, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया,नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन,आर्यलँड, कतार, हॉगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हियतनाम, इटली, स्विडन,  इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्टइंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्युझिलॅंड, सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व आफ्रिका, फ्रान्स, नैरोबी, न्युयार्क, जॉर्जिया, कामेरुन, युनायटेड अरब अमिराती, कांगो, सिरा लिओन,  लिओन, इथोपिया या विविध देशातून नागरिक मुंबईत दाखल झाले आहेत.


मुंबईतील प्रवाशांची संस्थात्मक क्वारंटाईन सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आलेली आहे. तर इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हामुख्यालयी पाठविण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. त्यांना त्यांचे जिल्हाधिकारी / महानगरपालिका आयुक्त यांच्या मार्फत क्वारंटाईन करण्याची कार्यवाही केली जात आहे.


इतर राज्यातील प्रवाशांसाठी


इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतुक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबई येथील कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. या प्रवाशांचा वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येत आहे.