मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींपुढे मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची (Maratha Reservation) गरज आणि समाजाच्या भावना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (sambhaji raje chhatrapti) हे उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद (president ramnath kovind) यांची भेट घेणार आहेत. या भेटीकरिता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठविण्याचे आवाहन केलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संभाजीराजेंच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन महाराष्ट्रातून शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि काँग्रेसतर्फे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर हे आजारी असल्याने आमदार संग्राम थोपटे हे त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात सहभागी असणार आहेत. 


केंद्रांने नुकतीच 127 वी घटनादुरुस्ती केली आहे. नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार त्यामुळे पुन्हा राज्यांना दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रपतींकडे या शिष्टमंडळाकडून काय मागणी केली जाते याकडे सर्वांच लक्ष आहे.


छत्रपती संभाजीराजे हे सुरूवातीपासून मराठा आरक्षण लढ्यात सक्रीय असून रस्त्यावरील आंदोलनांपासून ते न्यायालयीन लढाईपर्यंत सर्व स्तरांवर ते प्रयत्नशील राहिले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी कुण्या एकाची नसून सर्व पक्षांनी एकत्र येऊन यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज संभाजीराजेंनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे.