मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरू; संभाजीराजेंचा इशारा
सरकार मुख्यमंत्री चालवतात की अधिकारी?
मुंबई: राज्य सरकारने आझाद मैदानावरील मराठा आंदोलकांच्या मागण्या लवकरात लवकर मार्गी लावल्या नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला आहे. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. छत्रपती संभाजीराजे आज आझाद मैदानावर आंदोलन करत असलेल्या मराठा आंदोलकांची भेट घेण्यासाठी आले होते.
सरकार उमेदवारांच्या नियुक्त्या करत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याचा पवित्रा मराठा समाजातील तरुणांनी घेतला आहे. मराठा तरुणांच्या आंदोलनाचा आज ३६ वा दिवस आहे. आंदोलनकर्त्यांनी अन्नत्याग केल्यानंतर दोन तरुणांची प्रकृती बिघडली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी या आंदोलकांशी संवाद साधला.
आझाद मैदानातील मराठा आंदोलकाना भोवळ
आंदोलकांची भेट घेतल्यानंतर त्यांनी म्हटले की, मराठा आरक्षणासंदर्भात सगळेजण बैठका घेत आहेत. मराठा आंदोलकांच्या मागण्यांना कोणाचाच विरोध नाही तर मग निर्णय का घेतला जात नाही?, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला. सरकार काही अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार वागत आहे. ही बाब योग्य नाही. सरकारने आता युद्धपातळीवर निर्णय घ्यायला पाहिजे. आपण यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य होणार किंवा नाही, हे एकदाचे स्पष्ट करा. जेणेकरून आम्हाला पुढील दिशा ठरवता येईल, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.
दरम्यान, आझाद मैदानावरील आंदोलकांनी सरकार उमेदवारांच्या नियुक्त्या करत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भातील उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना हटवा, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे.