तलवारीचा उपयोग ओबीसींवर होणार की अन्य कोणावर, भुजबळांचा राजेंना टोला
तलवारीचा उपयोग ओबीसींवर होणार की अन्य कोणावर, असा सवाल ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी छत्रपती संभाजीराजे यांना विचारला आहे.
मुंबई : तलवारीचा उपयोग ओबीसींवर होणार की अन्य कोणावर, असा सवाल ओबीसी नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी छत्रपती संभाजीराजे यांना विचारला आहे. एमपीएससी परीक्षा व्हायला हवी होती, असे सांगत भुजबळांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली.
राजे सर्व जनतेचे असतात, एका समाजाचे नाही, त्यामुळे राजांनी सर्व समाजाचा विचार करावा, असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. आता तलवारीचा उपयोग ते ओबीसीवर करतात की अजून कोणावर हे पाहावं लागेल, अशी टीका भुजबळ यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर जास्त काही बोलता येणार नाही, पण एमपीएससी परीक्षा व्हायला हवी होती, असे ते म्हणाले.
दरम्यान, मराठा समाजाने ओबीसीमध्ये यावे, असं मी बोललोच नाही. खासगीत झालेल्या संभाषणात संभाजीराजे यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा, असा खुलासा बहुजन विकासमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. ओबीसींसाठी लढतो म्हणून राजकीय हलाल करण्याचा तर विचार नाही ना, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
संभाजीराजेंची भूमिका अन्याय करणारी नसावी आणि ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाला धक्का लावू नका, असं मतही वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केले.
दरम्यान कोल्हापूरात मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद पार पडली यावेळी समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी मराठा समाजातील काही श्रीमंत लोकांकडे पाहून आरक्षण नाकारले जात असल्याचा आरोप केला. कपाळावर कुंकू असून विधवेसारखी अवस्था मराठा समाजाची झाली असल्याची तिखट प्रतिक्रीया कोंढरे यांनी दिली. संधी मिळाली नाही तर हातात दगड घेणारच ना? असा सवाल उपस्थित करत इशाराही दिला.